मलेशियन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

वृत्तसंस्था, कौलालंपूर
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत झालेल्या पराभवाची परतफेड मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेत करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू सज्ज झाले आहेत.
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटून प्रयत्नांची शिकस्त करतील. लक्ष्य सेनचे दुखापतीनंतर या स्पर्धेसाठी भारतीय संघात पुरनरागमन झाले आहे. त्याचा पुरूष एकेरीतील सलामीचा सामना इंडोनेशियाच्या मोहम्मद झाकी उबेदिला बरोबर होणार आहे. या स्पर्धेत पुरुष विभागात तरुण मणिपल्ली, किरण जॉर्ज, एचएस प्रणॉय यांना पहिल्या फेरीत फ्रान्सच्या स्पर्धकांशी लढत द्यावी लागेल. किरण जॉर्जचा सलामीचा सामना अॅलेक्स लेनीर बरोबर तर एचएस प्रणॉयचा सलामीचा सामना ख्रिस्टो पोपोव्हशी होणार आहे.
पुरूष दुहेरीत हरिहरन अंशकरुण आणि एम. आर. अर्जुन भारताचे प्रतिनिधीत्व करणार असून त्यांचा दुहेरीतील सलामीचा सामना फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्ह आणि टोमा ज्युनियर पोपोव्हशी होणार आहे.
महिला एकेरीमध्ये उन्नती हुडा आणि माल्विका बनसोड यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. डेन्मार्कमध्ये चालु महिन्याच्या प्रारंभी झालेल्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला फ्रान्सकडून 0-3 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताच्या तन्वी शर्माचा सलामीचा सामना थायलंडच्या ओ. पिचमॉनशी होणार आहे. उन्नती हुडाचा सलामीचा सामना चीनच्या हेन झीबरोबर तर माल्विका बनसोडचा सलामीचा सामना जर्मनीच्या ली बरोबर तसेच अनमोल खर्बचा पहिला सामना डेन्मार्कच्या लिने होजमार्कशी होणार आहे. या स्पर्धेत भारताची टॉपसिडेड जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी सहभागी होणार नाहीत.
Source link



