भारत-इटली व्यापारवृद्धीचे ध्येय

2029 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 22 अब्ज युरोपर्यंत
वृत्तसंस्था/ रोम
भारत आणि इटली यांनी द्विपक्षीय व्यापारात मोठी वृद्धी करण्याचे ध्येय ठेवले आहे. आगामी तीन वर्षांमध्ये हा व्यापार सध्याच्या 14 अब्ज युरोवरून 22 अब्ज युरोपर्यंत नेला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांच्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. पाच देशांच्या त्यांच्या या दौऱ्याची संगता इटलीच्या भेटीने होत आहे. बुधवारी दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही देशांचे संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेली तीन वर्षे दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारीविषयी वाटाघाटी होत आहेत. दोन्ही देशांच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. या प्रयत्नाचे फलित म्हणून ही विशेष धोरणात्मक भागीदारी साकारली जात आहे, असे वक्तव्य जॉर्जिया मेलोनी यांनी केले आहे.
टप्प्याटप्प्याने प्रगती
गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि इटली यांच्या आर्थिक संबंधांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रगती होत आहे. 2023 मध्ये संयुक्त धोरणात्मक कृतीची रुपरेषा निर्धारित करण्यात आली. या रुपरेषेनुसार 2025 ते 2029 या चार वर्षांसाठी एक योजना निर्धारित करण्यात आली. या योजनेची घोषणा गेल्यावर्षी ब्राझील येथे झालेल्या जी-20 परिषदेच्या निमित्ताने करण्यात आली. 2029 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार 22 अब्ज युरोपर्यंत (साधारणत: 2 लाख 46 हजार 950 कोटी रुपये) नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तो पूर्ण होईल, असा विश्वास आहे, अशी माहितीही जॉर्जिया मेलोनी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.
इटलीच्या समर्थनासाठी आभार
भारत आणि युरोपियन महासंघ यांच्या मुक्त व्यापार करार करण्यात आला आहे. हा करार होत असताना इटलीने अनेक मुद्द्यांवर भारताचे समर्थन केले होते. इटलीच्या या सहकार्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशाचे आभार मानले आहेत. या मुक्त व्यापार कराराचे कार्यान्वयन त्वरेने व्हावे, अशी भारत आणि इटली या दोन्ही देशांची इच्छा असून युरोपियन महासंघाच्या प्रत्येक सदस्य देशाने या कराराला त्याच्या संसदेची मान्यता मिळवून घेतल्यानंतर तो लागू होणार आहे.
चार महत्त्वाची क्षेत्रे
भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान विकास या चार क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने होणार आहे. विशेषत: संरक्षण क्षेत्रात दोन्ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहेत. तसेच ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणस्नेही आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी सहकार्य केले जाईल, अशीही माहिती देण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत
बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीची राजधानी रोम येथे आगमन झाले. त्यांचे सैन्यदलांच्या मानवंदनेने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची द्विपक्षीय संबंधांवर शिखर परिषद झाली. या परिषदेत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनीही भाग घेतला. भविष्यकालीन सहकार्यवृद्धीसाठीची रुपरेषा याच चर्चेत दोन्ही देशांनी निर्धारीत केली आहे.
दिली ‘मेलोडी टॉफी’ची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा इटली दौरा आणखी एका विशेष घटनेने गाजत आहे. त्यांनी मेलोनी यांना भारतातील पारले कंपनीनिर्मित ‘मेलोडी’ नामक प्रसिद्ध चॉकलेटे भेट दिली. मेलोनी यांनी एक-दोन चॉकलेटांचा आस्वादही घेतला. दोन्ही नेत्यांनी कारमधून काही काळ एकत्र प्रवास करुन रोममधील प्रसिद्ध स्थळे पाहिली. या घटनेतून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तीगत स्नेहाचेही दर्शन घडले. सोशल मिडियावरही ही चॉकलेटांची भेट आणि एकत्र प्रवास यांची चर्चा होत असून अनेक विनोदी आणि सूचक मीम्सही लोकांनी प्रसारीत केले आहेत. एकंदर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा इटली दौरा इतर दौरांपेक्षा वैशिष्ट्यापूर्ण ठरल्याचे दिसले.
संबंधांना नवी झळाळी
ड भारत-इटली संबंधांचे रुपांतर आता ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’त होणार
ड संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देश एकत्रिरित्या तंत्रज्ञान विकासासाठी प्रयत्न करणार
ड कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातही भारत आणि इटली एकमेकांना सहकार्य करणार
Source link



