भटकळ दुर्घटनेतील मृतांची संख्या 11

एकाच कुटुंबातील 8 जण : 3 महिला बचावल्या
कारवार : भटकळ तालुक्यातील त्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 इतका झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे. भटकळ तालुक्यातील अळवेकोडी येथील पळ्ळीहोळे नावाच्या नदीत शिंपले काढण्यासाठी गेले असता सारदहोळे-पडुशिराली आणि हिरेहेतलु येथील 14 जण बुडाले होते. यापैकी 8 मृतदेह रविवारी दुपारी आढळून आले होते. तिघेजण बुडून बेपत्ता झाले होते. यापैकी मजम्मा गोयदु नाईक (वय 50) आणि नागरत्ना परमेश्वर नाईक (वय 40) यांचे मृतदेह रविवारी संध्याकाळी आढळून आले होते. बेपत्ता झालेल्या मादेव भरप्पा नाईक (वय 52) यांचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी, एनडीआरएफच्या जवानांनी, किनारपट्टी सुरक्षितता दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मादेव नाईक यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. उडुपी येथील तज्ञ ईश्वर मलपे आणि सहकाऱ्यांनी अंधाराची पर्वा न करता मादेव नाईक यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापि रविवारी कुणाच्याही प्रयत्नांना यश आले नव्हते. सोमवारी सकाळी मादेव नाईक यांचा मृतदेह आढळून आला. एकाच दुर्घटनेत एकाच गावातील 11 जणांचा मृत्यू होणे ही कारवार जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
उपचार घेणाऱ्यांच्या जीवावरील धोका टळला
या दुर्घटनेतील नागरत्ना ईश्वर नाईक, मादेवी मंजुनाथ नाईक आणि लता जगदीश नाईक या तीन महिलांना स्थानिकांनी वाचविले होते. अत्यवस्थ स्थितीतील या तीन महिलांना पहिल्यांदा भटकळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी उडुपी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तिन्ही महिलांच्या जीवावरील धोका टळल्याचे सांगण्यात आले. या महिलांकडून ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याची अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अधिक आर्थिक मदतीची मागणी
भटकळ तालुक्यातील या भीषण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, भटकळचे माजी आमदार सुनील नाईक यांनी राज्य सरकारकडे मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
Source link



