Uncategorized

भारताशी हातमिळवणी करण्यास पाकिस्तान उत्सुक, शहाबाझ शरीफ यांच्या सल्लागाराने केले प्रतिपादन

► वृत्तसंस्था इस्लामाबाद
भारताशी हातमिळवणी करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे प्रतिपादन पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांचे विशेष सल्लगार राणा सनाउल्लाह खान यांनी केले आहे. तथापि, भारताशी संबंध बिघडविण्यास पाकिस्तान स्वत:च कारणीभूत आहे, अशीही महत्वाची टिप्पणी त्यांनी केली. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना त्यांनी हे प्रतिपादन केल्याचे दिसून येत आहे.
खरे तर पाकिस्तानकडे भारताशी मैत्री करण्याची मोठी संधी उपलब्ध होती. तथापि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अंधळा द्वेष करुन पाकिस्तानने ही संधी गमावली, असा गौप्यस्फोटही त्यांनी या मुलाखतीत केला आहे. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचा दूरध्वनी स्वीकारत नाहीत. याला कारण आम्ही स्वत:च आहोत, अशी टीकाही त्यांनी पाकिस्तानी नेतृत्वावर केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा उल्लेख
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्याचा उल्लेख खान यांनी या मुलाखतीत केला. त्यावेळी भारताशी अधिक जवळीक साधण्याचा आणि मैत्री करण्याचा चांगला अवसर पाकिस्तानकडे होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विनाकारण द्वेष करण्याची पाकिस्तानी नेतृत्वाची वृत्ती आड आली.

त्यामुळे पाकिस्तानने ही संधी गमावली. आता पुन्हा ही संधी मिळविण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागत आहेत. त्यावेळी संधी गमवावयास नको होती, असेही खान यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

भीतीचे परिणाम भोगावे लागत आहेत
भारत आणि पाकिस्तान हे मागच्या दाराने संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याचे सकारात्मक उत्तर त्यांनी दिले. अशी ‘ट्रॅक टू’ डिप्लोमसी भारताशी होत आहे. ती कधीही बंद झालेली नव्हती. कोणत्याही दोन देशांमध्ये अशी गुप्त चर्चा होत असते.

पाकिस्तानचे माजी नेते नवाझ शरीफ यांच्या असमंजस राजकारणामुळे भारताशी हातमिळवणी करण्याची संधी पाकिस्तानने गमावली असली, तरी आता पाकिस्तान संबंध सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधी भीतीचे वातावरण पाकिस्ताननेच निर्माण केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करणेच बंद केले.

भारत आपल्यावर क्षेपणास्त्रांचा हल्ला करेल, असे भय पाकिस्तानला सातत्याने वाटत आहे. त्यांची भीती आता पाकिस्तानच्या नेतृत्वाला वाटत आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च शांतीचा संदेश घेऊन पाकिस्तानात आले होते, तेव्हा पाकिस्तानने थोडा शहाणपणा दाखविला असता, तरी आज ही वेळ आली नसती, अशीही स्पष्टोक्ती खान यांनी यावेळी केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​