Uncategorized

पांचगणीतील नामांकित ‘पाईनवूड इंटरनॅशनल स्कूल’ची मान्यता धोक्यात! शिक्षण विभागाची मोठी कारवाई

पांचगणी : इम्तियाज मुजावर
पर्यटन आणि दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणी येथील ‘पाईनवुड इंटरनॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज’ प्रशासन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाच्या मनमानी व नियमबाह्य कारभारामुळे या शाळेची मान्यता रद्द करण्याची अत्यंत गंभीर कारवाई शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी या शाळेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (कोल्हापूर विभागीय मंडळ) कडील मान्यता काढून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालकांकडे ‘स्वयंस्पष्ट शिफारस’ पाठवली आहे. त्यामुळे या नामांकित शाळेची मान्यता आता अंतिम टप्प्यात रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

​पालक आणि शिक्षकांच्या तक्रारींनंतर चौकशीचा फेरा
​या कारवाईची पाळेमुळे मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या वादात आहेत. पाईनवुड स्कूलमधील सहायक शिक्षक आणि तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकांविरोधात गंभीर स्वरूपाचे लेखी तक्रार अर्ज शिक्षण विभाग आणि पांचगणी पोलीस ठाण्यात दाखल केले होते. या तक्रारींची दखल घेत पांचगणी पोलिसांनीही शाळेच्या एकूण कामकाजाची शासकीय चौकशी करण्याची विनंती शिक्षण विभागाला पत्राद्वारे केली होती.

मिळालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त समितीने शाळेला अचानक भेट देऊन चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शाळेला मंजुरी देताना शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन व्यवस्थापनाकडून केले जात असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार ‘महाराष्ट्र स्वयं-अर्थसहाय्यित शाळा (स्थापना आणि नियमन) कायदा २०१२’ मधील कलम १४ अन्वये या शाळेची आय.सी.एस.ई. (ICSE) आणि राज्य मंडळाची मान्यता काढून घेण्याची शिफारस यापूर्वीच करण्यात आली होती.

​१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले रोखले; पालकांमध्ये संताप
​शाळेच्या मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले (LC) देण्यास नकार दिल्याच्या नवीन तक्रारी पालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभाग अधिक आक्रमक झाला. शिक्षणाधिकाऱ्यांनी याप्रकरणी घेतलेल्या सुनावणीत आणि पाठवलेल्या नोटीसांना शाळेकडून योग्य उत्तरे दिली गेली नाहीत, तसेच काही शासकीय पत्रे स्वीकारण्यासही मुख्याध्यापकांनी नकार दिला होता.

 

​कोल्हापूर विभागीय मंडळाकडून कडक पावले
​या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी, सातारा यांनी कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिवांकडे शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी शिक्षण उपसंचालक (कोल्हापूर विभाग) यांना या प्रकरणाचा ‘स्वयंस्पष्ट शिफारशीसह’ अंतिम प्रस्ताव तात्काळ मंडळाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सातारा शिक्षण विभागाने आपला अंतिम अहवाल उपसंचालकांकडे सुपूर्द केला आहे.
​शिक्षण विभागाच्या या धडक कारवाईमुळे पांचगणीतील शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या आणि शासकीय नियमांना हरताळ फासणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाने घेतलेल्या या कठोर भूमिकेचे जागरूक पालकांकडून स्वागत होत आहे. आता कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ यावर कधी अंतिम शिक्कामोर्तब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​