नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून अर्जेंटिनाच्या महिला विजेत्या

नेदरलँड्सचे सलग चौथे जेतेपद हुकले, बेल्जियमला 48 वर्षांनंतर पहिले कांस्यपदक, ऑस्ट्रेलियावर 1-0 गोलफरकाने मात
वृत्तसंस्था, अॅमस्टेलवीन :
महिलांच्या एफआयएच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये नेदरलँड्सचा 3-1 असा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. या विजयामुळे अर्जेंटिनाने मागील विश्वचषक आणि टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेत आपले तिसरे विजेतेपद मिळवले.
सामन्यातील पहिला गोल 30 व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या यिब्बी जानसेनने केला, जिला जगातील सर्वोत्तम ‘ड्रॅग-फ्लिकर’ मानले जाते. अर्जेंटिनाला सामन्यात आठ पेनल्टी कॉर्नर्स मिळाले, त्यापैकी आठव्या पेनल्टी कॉर्नरवर 54 व्या मिनिटाला मारिया ग्रॅनाटोने ‘रिबाउंड’वर गोल करून बरोबरी साधली आणि सामना पेनल्टी शूटआउटमध्ये नेला. शूटआउटमध्ये नेदरलँड्ससाठी मार्जिन व्हीनने गोल केला, तर पिएन सँडर्स आणि फेलिस अल्बर्स यांना गोल करण्यात अपयश आले. अर्जेंटिनासाठी व्हिक्टोरिया ग्रॅनाटो, ब्रिसा ब्रुगेसर आणि सोफिया कैरो यांनी गोल केले, तर झो डियाझचा गोल ‘रेफरल’नंतर अमान्य ठरवण्यात आला.
यापूर्वी अर्जेंटिनाने 2002 आणि 2010 मध्ये नेदरलँड्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. हा सामना चार वर्षांनंतर झालेली पुनरावृत्ती होती. कारण या दोन्ही संघांची यापूर्वी 2022 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गाठ पडली होती, ज्यात नेदरलँड्सने 3-1 असा विजय मिळवला होता. हे संघ टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाच्या सामन्यातही आमनेसामने आले होते आणि तिथेही नेदरलँड्सने अगदी याच फरकाने विजय मिळवला होता.
बेल्जियमला तिसरे स्थान
तत्पूर्वी, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बेल्जियमने ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले. चार्लोट एन्गलबर्टने एकमेव विजयी गोल नोंदवला
त्यापूर्वी नऊ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या नेदरलँड्सने बेल्जियमविऊद्धच्या नाट्यामय लढतीत विजय मिळवला होता. यात सामन्याच्या शेवटी प्रतिस्पर्ध्याचा एक गोल अमान्य ठरल्याचा त्यांना फायदा झाला आणि त्यांनी केवळ एका गोलच्या फरकाने उपांत्य सामना जिंकला. दुसरा उपांत्य सामनाही तितकाच चुरशीचा ठरला आणि त्यात अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा त्याच फरकाने पराभव केला.
अंतिम सामन्यात सुऊवातीची 15 मिनिटे दोन्ही संघांनी एकमेकांच्या खेळाचा अंदाज घेत चुरशीची लढत दिली. नेदरलँड्सने आठव्या मिनिटाला पहिला हल्ला चढवला. यावेळी मार्लीन जोचेम्सने ‘सर्कल’मध्ये चेंडू पाठवला, परंतु तो स्वीकारण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे कोणीही नव्हते. दोन मिनिटांनंतर सँडर्स पुन्हा ‘सर्कल’मध्ये घुसली, परंतु अर्जेंटिनाच्या बचावपटूंनी चेंडू सुरक्षितपणे दूर केला. मध्यांतरापूर्वीच्या शेवटच्या मिनिटात नेदरलँड्सला सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जान्सेनने शक्तिशाली ‘ड्रॅग फ्लिक’द्वारे स्पर्धेतील आपला आठवा गोल नोंदवला.
विश्रांतीनंतर, 33 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु त्यांचा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न कमकुवत होता आणि ही चाल अयशस्वी ठरली. अर्जेंटिनाने त्यानंतर आक्रमणे सुरूच ठेवली. त्यांना अखेर त्यांच्या आठव्या पेनल्टी कॉर्नरवर यश मिळाले. यावेळी गोर्झेलानीचा ‘फ्लिक’ रोखण्याचा प्रयत्न करताना डच गोलरक्षकाचा पाय घसरला आणि गोलच्या उजव्या बाजूला उभी असलेली अर्जेंटिनाची कर्णधार ग्रॅनाटोने ‘रिबाउंड’वर चेंडू जाळीत सारला.
Source link



