Uncategorized

जुरेलच्या शतकाने भारताचा धावांचा डोंगर

503/9 वर भारताचा डाव घोषित; श्रीलंका 8/2, तब्बल 495 धावांनी पिछाडीवर

वृत्तसंस्था, कोलंबो

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. ध्रुव जुरेलच्या नाबाद 115 धावांच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने 138 षटकांत 503 धावांवर 9 विकेट गमावल्यानंतर डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला सुऊवातीलाच दोन धक्के देत दिवसाचा शेवट भारताच्या बाजूने केला. दिवसअखेर श्रीलंकेची धावसंख्या 3 षटकांत 8 धावा आणि 2 फलंदाज बाद झाले होते. त्यामुळे यजमान संघ भारताच्या पहिल्या डावापेक्षा 495 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ध्रुव जुरेलचे नाबाद शतक. जुरेलने अत्यंत संयमी आणि जबाबदारीने फलंदाजी करत 177 चेंडूंत नाबाद 115 धावा केल्या. त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार होते. सुऊवातीला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जुरेलला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने संयम सोडला नाही. नव्वदीत पोहोचल्यानंतर काही काळ तो दबावाखाली दिसला. अखेर शतक पूर्ण केल्यानंतर त्याने फटकेबाजीला सुऊवात केली आणि दोन षटकार लगावत भारताला 500 धावांच्या पुढे नेले. त्यानंतर भारताने डाव घोषित केला.

शतकानंतर ‘जय जवान, जय किसान’ सेलिब्र्रेशन

हे जुरेलचे कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. श्रीलंकेच्या भूमीवर सातव्या क्रमांकावर किंवा त्याखाली फलंदाजी करत शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही त्याने आपले नाव नोंदवले. शतक पूर्ण केल्यानंतर जुरेलने केलेले सेलिब्र्रेशनही चर्चेचा विषय ठरले. त्याने हातावर लिहिलेला ‘जय जवान, जय किसान’ संदेश दाखवत आपल्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीला अभिवादन केले. जुरेलने नंतर सांगितले की त्याचे आजोबा शेतकरी होते, तर त्याचे वडील सैन्यात होते.

दुखापतीवर मात करत पंतचे अर्धशतक

पहिल्या दिवशी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा याचा चेंडू मनगटाला लागल्यानंतर ऋषभ पंतला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी फलंदाजीला येणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र, पंतने दुसऱ्या दिवशी मैदानात पुनरागमन करत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवला. त्याने 63 धावांची शानदार खेळी केली. जुरेलसोबत त्याने सातव्या विकेटसाठी 112 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताला 400 धावांचा टप्पा ओलांडणे सोपे झाले.

मधल्या फळीत रवींद्र जडेजाने 43 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे भारताच्या फलंदाजीतील जवळपास प्रत्येक फळीने संघाच्या मोठ्या धावसंख्येत योगदान दिले. भारतासाठी ही केवळ एका फलंदाजाची कामगिरी नव्हती. पडिक्कलचे शतक, गिलचे अर्धशतक, पंतची आक्रमक खेळी आणि जुरेलचे नाबाद शतक यामुळे भारताने श्रीलंकेसमोर धावांचा मोठा डोंगर उभा केला.

असिथा फर्नांडोचे चार बळी

श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो सर्वाधिक प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 4 बळी मिळविले. मात्र, त्यासाठी त्याला 106 धावा मोजाव्या लागल्या. भारताच्या लांबलेल्या फलंदाजीमुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सातत्याने दबाव राहिला. प्रबाथ जयसूर्या आणि केशरा नुवान्था यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतल्या तर लाहिरू कुमाराला एका बळीवर समाधान मानावे लागले.

  पावसामुळे सामन्याला वारंवार ब्र्रेक

कोलंबोतील हवामानाने दुसऱ्या दिवशीही दोन्ही संघांची परीक्षा घेतली. भारताचा डाव सुरू असतानाच पावसामुळे खेळ थांबवावा लागला. एका टप्प्यावर चहापानाचे सत्रही लवकर घ्यावे लागले आणि जवळपास दोन तासांचा खेळ वाया गेला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर जुरेलने आपले शतक पूर्ण केले आणि भारताने 500 धावांचा टप्पा पार केल्यानंतर डाव घोषित केला.

श्रीलंकेला सुऊवातीलाच दोन धक्के

503 धावांच्या विशाल धावसंख्येनंतर श्रीलंकेच्या पहिल्या डावाला सुऊवात झाली. भारतीय संघाने सुऊवातीपासूनच आक्रमक क्षेत्ररचना ठेवत विकेटच्या शोधात गोलंदाजी केली. प्रसिद्ध कृष्णाने लाहिरू उदाराला बाद करत भारताला पहिला बळी मिळवून दिला. तिसऱ्या स्लिपमध्ये यशस्वी जैस्वालने उत्कृष्ट झेल घेतला. त्यानंतर मानव सुथारने प्रबाथ जयसूर्याला पायचीत करत दुसरा धक्का दिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंका 8/2 वर होती. कमिल मिशारा 5 धावांवर नाबाद होता. भारताच्या 503 धावांच्या तुलनेत श्रीलंका तब्बल 495 धावांनी मागे होती.

जैस्वाल-असिथा वादावर आयसीसीची कारवाई

पहिल्या दिवसातील यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यातील मैदानावरील वादही चर्चेत राहिला. आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर कारवाई करत त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंडाची शिक्षा केली. दोघांनाही प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​