गोवा बनावटीच्या दारुसह स्विफ्ट कार जप्त

तळवडेत एलसीबीची मोठी कारवाई
न्हावेली /वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सावंतवाडी तालुक्यात गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत तब्बल ६ लाख ७१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक मारुती स्विफ्ट कार आणि मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० जून २०२६ रोजी सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी-तळवडे मार्गावरील गडगेवाडी तळी स्टॉप येथे एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी मनवेल फिलीप्स फर्नांडिस (रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) व मेलवीन फर्नांडिस (रा. गोवा) यांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी तपासणी केली असता वाहनातून १ लाख ७१ हजार ८४० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. तसेच ५ लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. एकूण ६ लाख ७१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (इ), ८१, ८३ तसेच बीएनएस कलम २८१ व मोटार वाहन कायदा कलम ५० अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सावंतवाडी पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे.ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड आणि पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी केली. सीमाभागातून होणाऱ्या दारू तस्करीला पोलिसांचा दणका गोवा-सिंधुदुर्ग सीमाभागातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, एलसीबीच्या या कारवाईमुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Source link



