Uncategorized

गुजरातचा राजस्थान रॉयल्सला दणका

पराभवानंतर राजस्थान टॉप-4 मधून बाहेर  

वृत्तसंस्था/  जयपूर 

सवाई मानसिंग स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर 77 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 4 विकेट्स गमावत 229 धावांचा डोंगर उभा केला. कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 152 धावांवर आटोपला. गुजरातने दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातसाठी पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर यश पुंजाने साई सुदर्शनला बाद केले. साई सुदर्शनने 36 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने जोस बटलरला बाद करून गुजरातला आणखी एक धक्का दिला. गिलने 44 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह 84 धावा केल्या. त्यानंतर जेसन होल्डर 7 धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी स्फोटक खेळी करत गुजरातचा डाव 229 धावांपर्यंत नेला. वॉशिंग्टन सुंदरने 20 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 37 तर राहुल तेवतियाने 4 चेंडूंमध्ये 14 धावांची नाबाद छोटी पण वेगवान खेळी केली. जोस बटलरने 13 धावांचे योगदान दिले.

राशिद खानची फिरकी ठरली घातक

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. कर्णधार यशस्वी जैस्वाल 3 धावा काढून बाद झाला. मात्र, वैभव सूर्यवंशीने अवघ्या 16 चेंडूत 36 धावा (3 चौकार, 3 षटकार) करत आक्रमक फलंदाजी केली. ध्रुव जुरेलनेही 10 चेंडूत 24 धाव करत त्याला चांगली साथ दिली पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. मध्यफळीत रवींद्र जडेजाने 25 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले, परंतु तो संघाला सावरु शकला नाही. याशिवाय, दसुन शनाकाने 16 तर शुभम दुबेने 15 धावा केल्या. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले. फिरकीपटू राशिद खानने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 33 धावा देऊन 4 महत्त्वाचे बळी टिपले. यामुळे राजस्थानचा डाव 152 धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स 20 षटकांत 4 बाद 229 (साई सुदर्शन 55, शुभमन गिल 84, सुंदर नाबाद 37, तेवतिया नाबाद 14, ब्रिजेश शर्मा 2 बळी, जडेजा आणि यश प्रत्येकी 1 बळी)

राजस्थान रॉयल्स 16.3 षटकांत सर्वबाद 152 (वैभव सूर्यवंशी 36, ध्रुव जुरेल 24, जडेजा 38, दुबे 15, शनाका 16, राशीद खान 4 बळी, होल्डर 3 बळी).

गुणतालिकेत उलथापालथ

राजस्थानविरुद्ध दणदणीत विजयानंतर गुजरात टायटन्सने थेट पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गुजरातचे आता 11 सामन्यांत 14 गुण झाले आहेत. पहिल्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद कायम आहे. हैदराबादचेही 14 गुण आहेत, मात्र नेट रनरेट अधिक चांगला असल्यामुळे त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. दरम्यान, सर्वात मोठा धक्का मात्र राजस्थान रॉयल्सला बसला आहे. या पराभवानंतर राजस्थान टॉप-4 मधून बाहेर फेकला गेला आहे.राजस्थानचे 11 सामन्यांत 12 गुण असले तरी खराब नेट रनरेटमुळे त्यांना खाली घसरावे लागले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​