गणेशोत्सवात स्थानिक विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्या; परप्रांतीयांची मक्तेदारी खपवून घेणार नाही : आशिष सुभेदार

सावंतवाडी प्रतिनिधी : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील फळ, फूल, भाजी विक्रेते तसेच स्थानिक व्यावसायिकांना नगरपालिकेने जागावाटपात प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी केली आहे. स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय करून परप्रांतीय व्यावसायिकांची मक्तेदारी वाढू दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गणेश चतुर्थीला काही दिवस शिल्लक असून, या सणाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी शहरात भाजीपाला, फळे, फुले, सजावटीचे साहित्य आणि विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने विक्रेते दाखल होतात. मात्र, बाहेरून येणारे काही विक्रेते मोठ्या प्रमाणावर जागा अडवून ठेवत असल्याने स्थानिक विक्रेते आणि व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जागेची अडचण निर्माण होते, असा आरोप सुभेदार यांनी केला.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाकडून दरवर्षी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागांची व्यवस्था केली जाते. मात्र, तुलनेने स्थानिक व्यापारी आणि विक्रेत्यांना कमी जागा मिळत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सुभेदार यांनी म्हटले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात स्थानिकांना जागावाटपात अधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नगरपालिका प्रशासनाने स्थानिक फळ, फूल, भाजी विक्रेते तसेच व्यापारी आणि व्यावसायिकांच्या हिताचा विचार करून योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून स्थानिक विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
Source link



