वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात एसएसपीएम हॉस्पिटलची मोफत ओपीडी सेवा सुरू;पहिल्याच दिवशी डॉ. संजीव आकेरकर यांनी केली रुग्णांची तपासणी

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात (SDH) एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या माध्यमातून मोफत बाह्यरुग्ण विभागाची (OPD) सेवा सुरू करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. मेडिसिन, न्यूरो फिजिशियन, नेफ्रॉलॉजी, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, जनरल सर्जरी, नेत्ररोग, कान-नाक-घसा, बालरोग तसेच दंतचिकित्सा आदी विभागांचा यामध्ये समावेश आहे.
या सेवेच्या पहिल्याच दिवशी डॉ. संजीव आकेरकर यांनी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. यावेळी वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी डॉ. आकेरकर यांचे स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य आपा फणसेकर, संकेत धुरी, भाजपा युवा मोर्चाचे तुषार साळगावकर तसेच वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्यासाठी दूरवर जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी स्थानिक पातळीवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे.
वेंगुर्ले येथील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच एसएसपीएम हॉस्पिटलचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Source link



