खोर्ली ग्रामपंचायतीला धक्का; सरपंच-पंच केरकर दांपत्य अपात्र

तिसवाडी : हितसंबंधाच्या संघर्षाचा आरोप सिद्ध झाल्याने खोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच गोरखनाथ केरकर आणि पंचसदस्य सुप्रिया केरकर यांना तिसवाडी गटविकास अधिकारी (बीडीओ) अनिल धुमस्कर यांनी तत्काळ प्रभावाने अपात्र ठरविले आहे. दोघेही पती-पत्नी असून, या निर्णयामुळे ग्रामपंचायतीतील त्यांची पदे रिक्त झाली आहेत.
बीडीओंच्या चौकशीत केरकर दांपत्याने त्यांच्या खासगी मालकीच्या जमिनीवरील बांधकामांना लाभ मिळवून देणाऱ्या पंचायत ठरावांमध्ये आणि संबंधित घर क्रमांक देण्याच्या कार्यवाहीत सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले. या निर्णय प्रक्रियेत त्यांचा वैयक्तिक हितसंबंध असल्याचे चौकशीत आढळून आल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांचा वैयक्तिक हितसंबंध असल्यास पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील बीडीओंच्या निर्णयाकडे स्थानिक पातळीवर महत्त्वपूर्ण कारवाई म्हणून पाहिले जात आहे.
तिसवाडी बीडीओंनी संबंधित प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गोवा पंचायत राज अधिनियम, 1994 अंतर्गत दोघांवरही अपात्रतेची कारवाई केली. निर्णयामुळे खोर्ली ग्रामपंचायतीतील सरपंच आणि पंच सदस्यपद रिक्त झाले आहे.
आता या दोन्ही पदांच्या रिक्ततेनंतर ग्रामपंचायतीचे कामकाज कसे चालविले जाणार आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया काय असेल, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे खोर्लीच्या स्थानिक राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
Source link



