कुंभारमाठमध्ये कातकरी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण; ‘नवजीवन महिला समूह’ स्थापन

कुंभारमाठ : आदिवासी कातकरी समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कुंभारमाठच्या पुढाकारातून ‘नवजीवन महिला समूह’ या बचत गटाची स्थापना करण्यात आली. सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, पंचायत समिती सदस्या सौ. मानसी भोगावकर आणि उमेद सीआरपी सौ. सारिका फोंडेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला.
महिलांमध्ये बचतीची सवय, स्वावलंबन आणि सामूहिक विकासाची भावना निर्माण व्हावी, यासाठी बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. कातकरी वस्तीतील महिलांनी एकत्र येत विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
‘नवजीवन महिला समूह’च्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सकू किसन निकम, उपाध्यक्षपदी लक्ष्मी गोपाळ पोवार आणि सचिवपदी मंजुळा रमेश कोळी यांची निवड झाली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर, सरपंच पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भिवा भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, उमेद सीआरपी सारिका फोंडेकर, अंगणवाडी सेविका भक्ती मांजरेकर यांच्यासह कातकरी वस्तीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना भविष्यात छोटे-मोठे उद्योग, स्वयंरोजगार आणि विविध आर्थिक उपक्रम सुरू करण्यासाठी मदत मिळणार आहे. नियमित बचतीसोबतच महिलांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञान आणि सामूहिक निर्णयक्षमता विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामपंचायत कुंभारमाठकडून कातकरी वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच आता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरही भर देण्यात येत आहे. त्यामुळे ‘नवजीवन महिला समूह’ हा उपक्रम आदिवासी महिलांच्या स्वावलंबनासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.
Source link



