Uncategorized

कोडोली पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

वारणानगर / प्रतिनिधी
‘आई, कोल्ड्रिंक आणून लगेच येते…’ असे सहज सांगून घरातून पाय बाहेर काढलेली अवघ्या 10 वर्षांची निष्पाप मुलगी थेट सोशल मीडियावरील तरुणासोबत पळून गेली. ही अत्यंत धक्कादायक आणि पालकांची उडवणारी घटना पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे घडली. मात्र, कोडोली पोलिसांच्या वेगवान आणि तांत्रिक तपासामुळे अवघ्या 24 तासांत मुलीचा शोध लागल्याने संभाव्य अनर्थ टळला.

अन्यथा एका लहान मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागला नसता.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी (दि. 22) दुपारी घराबाहेर गेलेली मुलगी रात्री उशिरापर्यंत परतली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी तातडीने कोडोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित मुलगी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून शहापूरच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी तिच्या सोशल मीडिया संपर्कांची आणि मित्रपरिवाराची सखोल चौकशी सुरू केली.
पोलिसांनी मुलीचे इन्स्टाग्राम अकाउंट आणि तिच्या मित्रांकडे कसून चौकशी केली. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडिया तपासाच्या आधारे पोलिसांनी शहापूरजवळील मिठारवाडी रस्त्यावरील एका निर्जन शेडमध्ये मुलीचा शोध लावला. तेथून मुलीसह समाधान उमेश चौगुले (वय 19) याला ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत इन्स्टाग्रामवरील ओळख, वाढलेली जवळीक आणि प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा यामुळे चिमुरडीने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. सध्या मुलीची मानसिक स्थिती खालावल्याने तिची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली असून, समाधान चौगुले यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

10 वर्षांच्या मुलीच्या हातात इन्स्टाग्राम पोहोचलेच कसे ?
ती सोशल मीडियावर 19 वर्षांच्या परक्या तरुणाशी चॅटिंग करत असताना तुम्ही कुठे झोपला होता का? लहान मुलांच्या हातातील मोबाईल हे खेळणे नाही, तर त्यांच्या भविष्याला लागलेली वाळवी आहे. मुलांच्या ऑनलाईन हालचालींवर कडक नजर ठेवा, अन्यथा पुढची पाळी तुमच्या मुलाची असू शकते! वेळीच जागे व्हा, असे पालकांना सांगण्याची वेळ आली आहे.

मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेने सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबरोबरच अल्पवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. मोबाईल आणि सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो, यावर मुलांचे भवितव्य अवलंबून असते. तज्ञांच्या मते, मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर पालकांनी नियमित लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद कायम ठेवणे आणि सोशल मीडियावरील संभाव्य धोक्यांविषयी जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे.
दरम्यान, कोडोली पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक कौशल्य आणि तत्परतेच्या जोरावर अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी तपास पथकाच्या कार्याची माहिती दिली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​