Uncategorized

केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी?

आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या समावेशाची चर्चा : काही मंत्र्यांना डच्चू मिळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये काही नवीन चेहऱ्यांचा समावेश होईल, तर अनेक प्रभावशाली व्यक्तींना वगळले जाण्याचीही शक्यता आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो अशी चर्चा असून त्यांची अर्थ मंत्रालयात वर्णी लागण्याची तयारी सुरू असल्याचे मानले जात आहे. विद्यमान अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांना दुसऱ्या विभागात नियुक्त केले जाऊ शकते.

सूत्रांच्या दाव्यानुसार, पंतप्रधानांचे प्रधान सचिव राहिलेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मंत्रिमंडळात आणण्यामागे अर्थ मंत्रालयात सुधारणा करणे आणि कामकाज सुधारणे हे कारण आहे. निर्मला सीतारामन यांचा मनुष्यबळ विकास मंत्रालयासाठी विचार केला जात आहे. दोन प्रभावशाली व्यक्तींना मंत्रिमंडळातून हटवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अन्य अर्धा डझन राज्यमंत्र्यांना हटवण्याची तयारी सुरू असल्याचेही मानले जात आहे.

पंजाबमधून तरुण चुघ यांना संधी

पंजाबमधील रवनीत बिट्टू यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची तयारी सुरू आहे. पक्षाने त्यांना पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळेच त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलेले नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ते आता जास्त काळ केंद्रीय मंत्री राहू शकणार नाहीत. भाजपने तरुण चुघ यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेत पाठवल्याने त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळू शकते. या मंत्रिमंडळ फेरबदलात पंजाबमधील आणखी दोन नावांचा विचार केला जात आहे. आम आदमी पक्षातून आलेले राघव चड्ढा आणि अशोक मित्तल या दोघांपैकी कोणालाही मंत्रिपदाचा लाभ मिळू शकतो.

मध्य प्रदेशातील संभाव्य नवीन चेहऱ्यांमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि नवनियुक्त राज्यसभा सदस्य महेश केवट यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महेश केवट यांना नवीन भूमिकेत आणले जाऊ शकते. अनुराग ठाकूर हेसुद्धा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेरठचे खासदार अरुण गोविल यांनाही संधी मिळू शकते. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांचे जाणेही निश्चित आहे. तसेच वचन दिल्याप्रमाणे नितीश कुमार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे गटालाही स्थान शक्य

महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे महत्त्व वाढू शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान, आपल्या कोट्यातील मंत्री प्रतापराव जाधव अडचणींचा सामना करत असल्यामुळे शिंदे गट त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी संधी देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सर्वात प्रभावशाली नाव संजय दीना पाटील यांचे असले तरी दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या ते कोंडीत सापडले आहेत.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​