आवाहनाला प्रतिसाद : कोण घेणार आमची दाद ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांना काटकसरीचा मंत्र : सराफांनी व्यक्त केल्या व्यथा अन् अपेक्षा
मनीषा सुभेदार/बेळगाव
ज्या देशात आपण राहतो त्या देशाशी इमान राखणे आपले कर्तव्य आहे. आपला देश जर कोणत्याही संकटात आला, अडचणीत सापडला तर सर्व शक्तीनिशी त्याचा सामना करीत आपण देशासोबत राहायला हवे. सध्याचा काळसुद्धा आपली परीक्षाच घेणारा ठरला आहे. इराण-अमेरिका युद्धाचा फटका सर्व देशांनाच बसला आहे. भारतही त्याला अपवाद नाही. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचा मंत्र दिला आहे. सोने खरेदी करू नका, परदेशी सहली थांबवा, यासह अन्य आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. एक देशवासीय म्हणून त्यांच्या आवाहनाचा आदर करत त्याला प्रतिसाद देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र परिस्थिती कशीही असली, युद्ध झाले तरी माणसाचे जगणे थांबत नाही.
ते अविरत सुरू असते. आणि त्यासाठी त्याला रोजीरोटीची गरज असते. पंतप्रधानांचे आवाहन आजच्या परिस्थितीला आवश्यक आहेच. मात्र त्याचवेळी काही व्यवसाय आणि लोक अडचणीत येण्याची चिन्हेही दिसत आहेत. सद्य परिस्थितीत सराफी व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे. देश प्रथम हे प्रत्येकालाच मान्य आहे. परंतु आपला चरितार्थ चालवायचा कसा, हा यक्षप्रश्नही निर्माण झाला आहे. आजतर गुरुपुष्यामृत योग सोने-चांदी खरेदीसाठी शुभमुहूर्त. त्यातच अधिक मास. त्यामुळे खरे तर खरेदी वाढायला हवी. तथापि, सराफी पेढीचा कानोसा घेता आणि सराफांशी संवाद साधता त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवाय कारागिरांच्या भवितव्याची चिंता त्यांना भेडसावू लागली आहे. या अनुषंगाने सराफांनी आपल्या व्यथा आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
‘थिंक प्रॅक्टीकल अँड टेक डिसीजन’
सोने खरेदी करू नका हे आवाहन योग्य आहे. परंतु सराफी व्यवसायाला त्याची झळ बसली आहे. आजघडीला भारतात पाच कोटीहून अधिक कारागीर आहेत. काम मिळाले नाही तर त्यांचे कुटुंब चालणार कसे? बऱ्याच सराफी पेढ्या किंवा शोरूम भाडेतत्त्वावर असतात. त्याचे भाडे देण्याचाही प्रश्न उद्भवतो. शिवाय कर्ज असेल तर ते फेडण्याचा प्रश्नही येतोच. देश प्रथम याबद्दल दुमत नाहीच, परंतु सरकार सराफांना काही सवलती देणार का? भाडे किंवा कर्ज यामध्ये सवलत मिळावी, अशी अपेक्षा आहे. शिवाय अनेकांनी वेगवेगळ्या स्वरुपात गुंतवणूक केलेली असते. त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरेदीवर परिणाम झाल्याने कारागिरांना काम मिळणार नाही. परिणामी बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. मी लोकांना आवाहन करतो की, सोने ही उत्तम गुंतवणूक आहे. त्यामुळे ‘थिंक प्रॅक्टीकल अँड टेक डिसीजन’.
-सिद्धार्थ शहा, संचालक, चंदूकाका सराफ ज्वेल्स
‘रि-सायकल’ करण्याची परवानगी द्यावी
दीड वर्षापासून सोने दरात चढ-उतार होत आहे. त्यामुळे सोने व्यवसायासमोर तग धरून राहण्याचे आव्हान आहे. त्यातच खरेदी थांबली तर आमच्यासह पाच कोटी कारागिरांवर विपरीत परिणाम होईल. पंतप्रधानांच्या आवाहनाला मान दिलाच पाहिजे. परंतु सरकारने जुने सोने ‘रि-सायकल’ करण्याची परवानगी द्यावी. ग्राहकांना किती सोने विकू शकतो याचा नियम घालून दिला तरी हा व्यवसाय तग धरेल. ग्राहकाने पन्नास ग्रॅम मागितले तरी आम्ही पाच ग्रॅम अशी मर्यादा पाळू शकतो. परंतु यावर सुवर्णमध्य आवश्यक आहे.
-निशील पोतदार, पोतदार ज्वेलर्स
चोख चांदी वस्तू स्वरुपात खरेदी करा
सोन्याबरोबरच चांदीच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. सोने-चांदी खरेदी झाली नाही तर कारागिरांबरोबरच पूरक उद्योगांवरही विपरीत परिणाम होणार आहे. मला असे वाटते, देशात भरपूर सोने आहे. ते बाहेर आणून त्याचा पुनर्वापर (रि-सायकल) व्हायला हवा, म्हणजे पंतप्रधानांच्या आवाहनाचेही पालन होईल व कारागीरही तग धरू शकतील. चांदीचा दर पुढेही वाढणारच आहे. एआयच्या क्षेत्रात चांदीची गरज भासणार आहे. त्यामुळे चांदीमध्ये केलेली गुंतवणूक पुढे नफा करून देणार हे नक्की. सध्या अधिक मासामुळे चोख चांदी खरेदी करण्यापेक्षा वस्तू स्वरुपात खरेदी करा. जुनी जोडवी, पैंजण, दिवे देऊन नवीन खरेदी करा. मात्र, गुंतवणूक थांबवू नका.
-सर्वेश पोतदार, संचालक, पोतदार ज्वेलर्स
कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे सोने खरेदीला खीळ बसली आहे. पण देशहितासाठी हा निर्णय योग्य आहे, त्यात गैर काही नाही. शिवाय आताचा दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. पुढे दर कमी होईल, असा आशावादही सामान्यांना आहे. सोने खरेदी थांबली तर सराफी व्यवसायाला फटका बसेल, कारागीरही अडचणीत येतील. साधारण एका दागिन्याच्या मागे बारा कुटुंबांचे काम सुरू असते. म्हणजेच विक्री करणारे, कर्मचारी, दागिने तयार करणारा, तासकाम करणारा, डाय करणारे, पॉलिश करणारे अशी ही साखळी आहे. त्यामुळे कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. यासाठी आपले जुने दागिने घेऊनच ते नवीन करावेत. परिस्थिती हळूहळू बदलेल तेव्हा पुन्हा सोने खरेदी करणे शक्य होईल.
-अतुल हेरेकर, संचालक, डी. के. हेरेकर ज्वेलर्स
देशहिताचाही विचार महत्त्वाचा
सोने खरेदी करू नका या आवाहनाचा परिणाम झालाच आहे. शिवाय कस्टम ड्युटी वाढल्याने परिणाम तीव्रपणे जाणवत आहे. सोने खरेदी न केल्याने सराफी व्यवसायावरच अवलंबून असणारे कारागीर बेरोजगार होतील. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होईल. जागतिक मंदी असली तरी पुढील काळात भारतामध्येही मंदीचा परिणाम होणार आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सराफ तीन ते चार महिने निभावू शकतील. परंतु वर्ष दोन वर्षे हीच स्थिती राहिली तर मात्र सराफी व्यवसायसुद्धा अडचणीत येणार हे नक्की. भारतातील सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट दिसू लागले आहे. अर्थात देशहिताचा विचार सर्वात महत्त्वाचा आणि त्याला प्राधान्य देणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र, जगा आणि जगू द्या या सूत्राचा विचारही व्हायला हवा.
-समीर गाडगीळ, कार्यकारी संचालक, पीएनजी
Source link



