आरसीबी-गुजरात आज पहिली क्वालिफायर लढत

धरमशालाच्या खेळपट्टीवर बेंगळूरच्या भक्कम फलंदाजी फळीची कसोटी पाहणार गुजरातची भेदक गोलंदाजी
वृत्तसंस्था
धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात आज मंगळवारी धरमशाला येथे ‘क्वालिफायर 1’मध्ये गुजरात टायटन्सचा सामना करणार असून यावेळी या हंगामातील सर्वांत शिस्तबद्ध गोलंदाजी आक्रमणाशी ते भिडणार आहेत. या सामन्यात थेट अंतिम फेरीतील प्रवेशही पणाला लागलेला असेल.
दोन्ही संघांनी 14 सामन्यांनंतर लीग टप्प्याचा शेवट प्रत्येकी 18 गुणांसह केला, परंतु सरस ‘नेट रन रेट’मुळे ‘आरसीबी’ने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि गुजरात टायटन्स हे कदाचित आयपीएल, 2026 मधील दोन सर्वांत परिपूर्ण संघ ठरले आहेत, तरीही प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी पूर्णपणे भिन्न मार्ग अवलंबले आहेत. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आपली मोहीम आक्रमक फलंदाजीवर आणि मागील हंगामांच्या तुलनेत अधिक भरवशाच्या गोलंदाजी फळीवर उभारली आहे.
विजेतेपदाचा बचाव करण्यास जुंपलेल्या या संघाने या हंगामात अनेकदा 200 धावांचा टप्पा ओलांडला. तसेच डावाच्या सुऊवातीला दिग्गज विराट कोहलीचा अनुभव आणि गोलंदाजीमध्ये जोश हेझलवुड व भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांच्या जोडीचा त्यांना प्रचंड फायदा झाला. घरच्या मैदानाबाहेर दूरस्थ ठिकाणीही सामने जिंकण्याची आणि अटीतटीचे सामने आपल्या बाजूने झुकवण्याची त्यांची क्षमता यामुळे ते लीग टप्प्यातील सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक बनले. धरमशाला येथील परिस्थितीशी असलेल्या अलीकडील परिचयाचा फायदाही ‘आरसीबी’ला मिळणार आहे. याच मैदानावर त्यांनी या महिन्याच्या सुऊवातीला पंजाब किंग्सविऊद्ध एक महत्त्वपूर्ण विजय नोंदवला होता.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आपल्या जबरदस्त गोलंदाजी आक्रमणाच्या आणि फलंदाजीच्या वरच्या फळीच्या जोरावर प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. या फलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना क्वचितच दडपण निर्माण करण्याची संधी दिली. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर यांनी संघाला तितकाच भक्कमपणा आणि आक्रमकता प्रदान केली आहे. परंतु या हंगामाच्या दुस्रया टप्प्यात गुजरातची गोलंदाजी विशेष उठून दिसली आहे. मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने नव्या चेंडूवर सातत्याने बळी मिळवले आहेत, तर रशिद खान आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर यांनी डावाच्या मधल्या षटकांत अत्यंत खुबीने नियंत्रण मिळवलेले आहे.
आपल्या लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी धुव्वा उडवल्यामुळे गुजरातचा संघ जबरदस्त आत्मविश्वासासह या ‘नॉकआउट’ लढतीसाठी सज्ज झाला आहे. या सामन्याचा निकाल काही प्रमुख वैयक्तिक लढतींवर अवलंबून राहू शकतो. त्यात विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यातील द्वंद्व ही या संध्याकाळची एक महत्त्वपूर्ण लढत ठरेल अशी अपेक्षा आहे. विशेषत: धरमशालाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना मिळणाऱ्या अतिरिक्त उसळीमुळे या लढतीची रंगत अधिकच वाढणार आहे. गुजरातच्या वेगवान गोलंदाजांकडून सुरुवातीला होणाऱ्या माऱ्याचा सामना करण्याची कोहलीची क्षमता ‘आरसीबी’च्या पॉवरप्लेची दिशा ठरवू शकते.
त्याचप्रमाणे सिराजविऊद्ध फिल सॉल्टचा आक्रमक पवित्रा सामन्याची सुऊवातीची गतीनिश्चित करू शकतो. विशेष म्हणजे आरसीबीसोबत आधीचे काही हंगाम खेळलेला असल्यामुळे सिराजला त्यांच्या रचनेची आणि रणनीतीची सखोल माहिती आहे. बोटाच्या दुखापतीवर उपचार करून घेण्यासाठी मायदेशी परतलेला सॉल्ट आता प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. दुसरीकडे, हेझलवूड आणि भुवनेश्वर हे गोलंदाज प्रकाशझोताखाली चेंडूला मिळणाऱ्या स्विंगचा वापर करून गिल आणि सुदर्शन यांची कसोटी पाहतील. रशिद खान आणि आरसीबीची उजव्या हाताच्या फलंदाजांचे वर्चस्व असलेली फलंदाजी फळी यांच्यातील मधल्या षटकांतील सामनाही निर्णायक ठरू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर-रजत पाटीदार (कर्णधार), व्यंकटेश अय्यर वा फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार, इम्पॅक्ट प्लेयर : टिम डेव्हिड.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, रशिद खान, कागिसो रबाडा, अर्शद खान, मोहम्मद सिराज, इम्पॅक्ट प्लेयर : प्रसिद्ध कृष्णा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.
Source link



