आंबोली घाटात दरीत उडी टाकून डंपर चालकाची आत्महत्या

वार्ताहर /आंबोली
आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम रघुनाथ कुडतरकर ( 31) रा. आंबोली गावठणवाडी या डंपर चालकाने ऊडी मारून आत्महत्या केली. एक रात्र डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आल्याने त्यांनी ड्रोन द्वारे घाटात पाहणी केली असता त्याचा मृतदेह सुमारे बाराशे फूट खोल दरीत आढळून आला. ड्रोन कॅमेऱ्यात फक्त हात आणि पाय दिसत होता.सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमचे सदस्य उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा, प्रथमेश गावडे यांनी खोल दरीत उतरून मृतदेह वर काढला.यावेळी रेस्क्यू टीमचे सदस्य राजु राऊळ, राकेश अमृस्कर दिपक मेस्त्री, फास्कू देसा, गुरु सावंत, संतान अल्मेडा, सहदेव सनाम, अमरेश गावडे, रमेश मोहीते यांनी मृतदेह वर काढण्यास मदत केली. राजाराम याचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. परंतु पत्नी सोबत नसल्याने त्याचे काही दिवसापासून मानसिक संतुलन बिघडले होते. तशातच त्याने घाटात डंपर लावून दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.राजाराम अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचा होता. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटस्थळी भेट दिली. आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार मनिष शिंदे हे घटनास्थळी होते.
Source link


