अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीचे सामने आजपासून

अल्कारेझची सलामीची लढत सैफुलीनशी तर साबालेंकाची लढत ओसोरीओशी
वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
2026 च्या टेनिस हंगामातील येथे शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष आणि महिला एकेरीतील सामन्यांना रविवारपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी या स्पर्धेला गेल्या आठवड्यात मिश्र दुहेरी प्रकाराने प्रारंभ झाला होता. स्पेनचा कार्लोस अल्कारेझ आणि बेलारुसची आर्यना साबालेंका हे या स्पर्धेतील विद्यमान विजेते आहेत. अल्कारेझचा सलामीचा सामना रोमन सैफुलीनशी तर साबालेंकाचा पहिला सामना कॅमिला ओसोरिओशी होणार आहे.
अल्कारेझला चालू वर्षीच्या टेनिस हंगामात दुखापतीमुळे विम्बल्डन आणि फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेला मुकावे लागले होते. पण आता त्याची ही दुखापत पूर्णपणे बरी झाली असून त्याचे या स्पर्धेत पुनरागमन होत आहे. अमेरिकेच्या माजी अव्वल महिला टेनिसपटू व्हिनस विल्यम्सचा पहिल्या फेरीतील सामना रविवारी होणार आहेत. 46 वर्षीय व्हिनसला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे. तर यापूर्वी 6 वेळेला अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी 44 वर्षीय सेरेनाचे 2022 नंतर या स्पर्धेत यावेळी पुनरागमन होत आहे. सेरेनाने यावेळी सदर स्पर्धेमध्ये दुहेरीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने तिला अमेरिकन टेनिस संघटनेने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे. तसेच स्पर्धा आयोजकांतर्फे या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या सोफीया किनीनला शेवटचे वाईल्ड कार्ड देण्यात आले आहे. किनीनने 2020 साली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. व्हिनस आणि किनीन यांच्यात एकेरीच्या ड्रॉ नुसार गाठ पडणार आहे.
चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील ही शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. पुरुष आणि महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमधील सामन्यांना रविवारपासून प्रारंभ होत आहे. द्वितीय मानांकित अल्कारेझचा गेल्या एप्रिलनंतर पहिला एकेरी सामना या स्पर्धेतील सैफुलीन बरोबर होणार आहे. अल्कारेझने यापूर्वी दोन वेळेला अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. सदर स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत अल्कारेझ आणि सेरेना यांनी एकत्रित खेळ केला होता. सैफुलीनने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची चौथी फेरी गाठताना रशियाच्या रुबलेव्ह आणि फोन्सेका यांना पराभूत केले होते. पण त्यानंतर त्याला जोकोव्हिचकडून पराभव पत्करावा लागला होता. 2023 च्या पॅरिस एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत सैफुलीनने अल्कारेझला पराभवाचा धक्का दिला होता. अल्कारेझ या स्पर्धेत मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मानांकनात प्रेंच ग्रँडस्लॅम विजेता जर्मनीचा व्हेरेव्ह याला टॉप सिडींग देण्यात आली आहे. त्याचा सलामीचा सामना सोनेगो बरोबर होईल.
महिलांच्या विभागात बेलारुसची आतापर्यंत दोन वेळेला ही स्पर्धा जिंकणारी साबालेंका हिचा सलामीचा सामना कॅमिला ओसोरिओशी होणार आहे. ड्रॉ नुसार टॉप सिडेड साबालेंकाला चौथ्या फेरीत विम्बल्डन विजेत्या नोस्कोव्हाबरोबर लढत द्यावी लागेल. इलिना रायबाकिना, इगा स्वायटेक, जेसिका पेगुला, कॅरोलीना मुचोव्हा, मायरा अँड्रीव्हा, कोको गॉफ या अव्वल खेळाडुंच्या कामगिरीवर विशेष लक्ष साबालेंकाला द्यावे लागेल. अलिकडेच सिनसिनॅटी टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर फिल्स या स्पर्धेत चमत्कार घडवू शकेल. रुबलेव्हची गाठ सिलिप बरोबर पडू शकेल. गेल्या वर्षी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारा मुसेटी याचा सलामीचा सामना ब्रिटनच्या आर्थर फेरीशी होणार आहे.
नागलचे आव्हान समाप्त
भारताचा टेनिसपटू सुमीत नागल याचे अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. प्रमुख ड्रॉपूर्वी सध्या सुरु असलेल्या पात्र फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या आर्थर गे याने नागलचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव केला. या पराभवामुळे नागलला सदर स्पर्धेत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविता आले नाही. गेल्या वर्षी नागलने या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते.
Source link



