Nitin Chandanshive Exlusive शिवसेना प्रवेशाविषयीच्या प्रश्नावर दंगलकार काय म्हणाले? शिवसेनेचा वर्धापन दिन गाजवणाऱ्या नितीन चंदनशिवे यांच्याशी तरुण भारतचा संवाद

19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन नेहमीप्रमाणे तुफान भाषणांनी आणि मराठी बाणा आम्ही सोडणार नाही याच पालुपदाने गाजला. षण्मुखानंद सभागृहात वर्धापनदिनाचा कार्यक्रम पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साही शिवसैनिकांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जाग्या केल्या ;पण यावर्षी शिवसेनेच्या व्यासपीठावर अनपेक्षित एन्ट्री झाली ती कवी नितीन चंदनशिवे यांची.
विद्रोही, आंबेडकरवादी विचारांचे कवी म्हणून चंदनशिवे महाराष्ट्राला परिचित होतेच पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या व्यासपीठावर कवी चंदनशिवे पहिल्यांदाच आले आणि त्यांनी सभा जिंकली. चंदनशिवे यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील जनतेला अनेक प्रश्न पडले. चंदनशिवे यांना खा. संजय राऊत यांच्याकडून प्रवेशासाठी काही ऑफर आली का? कवी चंदनशिवे राजकिय प्रवेश करणार का? याच प्रश्नांवर तरुण भारतचे प्रतिनिधी राहुल सडोलीकर यांनी फोनवरुन त्यांच्याशी संवाद साधला…
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर मांडलेल्या भूमीकेची प्रेरणा काय होती?
दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी राहुल सडोलीकर यांच्याशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सध्या चाललेले फोडाफोडीचे राजकारण आवडलेलं नाही, आणि त्यामुळेच सर्वसामान्य जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे.
शिवसेनेत थेट प्रवेशाची काही शक्यता आहे का?
नितीन चंदनशिवे यांनी शिवसेनेच्या थेट प्रवेशाच्या प्रश्नावर सांगितले की, “मी कधीच कुठल्याच राजकिय पक्षात प्रवेश करणार नाही, मी कवी आहे आणि कवी म्हणूनच राहणार, जे जे सत्याच्या बाजूने उभे असतील, सर्वसामान्यांच्या बाजूने उभे असतील तसेच संविधानाला संपवणाऱ्यांच्या विरोधात जे जे उभे असतील त्यांच्या सोबत मी असणार” चंदनशिवे यांनी शिवसेना तसेच इतर कुठल्याच पक्षातील प्रवेशाची शक्यता नाकारली.
आंबेडकरवादी कवी असताना तुम्ही हिंदुत्वाच्या अजेंडा मांडणाऱ्या शिवसेनेसोबत कसे?
प्रतिनिधी राहुल सडोलीकर यांनी विचारलेल्या हिंदुत्ववादी पक्षाचा अजेंडा मांडणाऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर तुमच्यासारखा आंबेडकरवादी कवी कसा? या प्रश्नावर चंदनशिवे म्हणाले,”एकमेकांना जोडत जाणं आज गरजेचं आहे, एक नवं समीकरण आज महाराष्ट्रात तयार होणं गरजेचं आहे, कट्टर हिंदुत्वापेक्षा शेंडी आणि जानव्यातून मुक्त झालेलं हिंदुत्व असं स्वत: उद्धव साहेबांनी म्हटल्यामुळे आमच्या मनाला ते भावलं.
राम कृष्ण हरी म्हणणारा गावगाड्यातील हिंदू आमचा बांधवच आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, कुठल्याही कट्टर विचारधारेमुळे या महाराष्ट्राचं नुकसानंच होणारेय, एक कवी म्हणून मी यादृष्टीने याकडे पाहतो, महाराष्ट्रातील प्रत्येकाने एकमेकांचा हात हातात धरुन संविधानासाठी, लोकशाहीसाठी उभं राहिलं पाहिजे”
खा. संजय राऊत यांच्याकडून काही ऑफर आली का?
या प्रश्नावर बोलताना कवी नितीन चंदनशिवे म्हणाले, नाही कधीच नाही, फक्त एक आंबेडकरवादी, वास्तववादी आणि समतावादी कवी आहे, पँथर आहे याच नजरेतून संजय राऊत साहेबांनी मला त्यांच्या स्टेजवर बोलवलं होतं.
आंबेडकरी जनतेने सेनेसोबत यावं याचं तुम्ही प्रतिक तुम्ही होता का?
यावर बोलताना चंदनशिवे स्पष्टच म्हणाले की, “यादृष्टीने आतातरी मी याकडे पाहत नाही, पण संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहणारे जर असतील आणि त्यांना अडवायचं असेल तर भविष्यात असं समीकरण जुळणंही गरजेचं आहे” राजकारणात प्रवेश करण्याचा माझा कोणताही विचार नाही मी एक मानवतावादी, विद्रोही कवी आहे मला शिवसेनेकडूनच नव्हे तर, भविष्यात कुणाकडूनही विचारणा झाली तरी मी कुठल्याही राजकिय पक्षात प्रवेश करणार नाही. मी गावकुसाबाहेरच्या वंचितांची वेदना माझी कविता घेऊन मी उभा असेन, माझ्यासाठी कवी म्हणून जगणं महत्वाचं आहे.
Source link



