Nasrapur Case | नसरापूर चिमुकली हत्याकांड: ‘तुला कोणती शिक्षा देऊ?’ न्यायाधीशांच्या थेट प्रश्नावर नराधम कांबळेने काय उत्तर दिले?

पुणे – भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या संतापजनक प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला दोषी ठरवले आहे. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.
१ मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत निकाल लागल्याने हा खटला राज्यातील न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणांपैकी एक ठरला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आज निकाल जाहीर करत आरोपीला दोषी ठरवले.
सुनावणीदरम्यान आज कोर्टात काय घडलं?
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून विचारले की, त्या घटनेचा प्रसंग आठवून तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला हवी. यावर आरोपी भीमराव कांबळेने पुन्हा एक वेगळी कहाणी सांगत न्यायालयाला म्हटलं की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी-शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्या वेळी माझा पाय घसरला आणि मी पडलो, त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सतत ओरडत होती,” असं त्याने सांगितलं…
त्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटले की “आता तु जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी”, न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे. सरकारी वकिल युक्तीवाद करत आहेत आणि त्यांच्याकडून भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी करण्यात आली आहे.
Source link



