Uncategorized

Gandhinagar Enchrochment गांधीनगरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर, 23 बांधकामे पाडली

प्रतिनिधी, कोल्हापूर
गेल्या अनेक वर्षापासून गाजत असलेल्या आणि संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम राबवत तीन जेसीबी, सहा डंपर, गॅस कटर, तब्बल 600 कर्मचारी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात 14 मिळकतधारकांची 23 बांधकामे भुईसपाट केली.

यावेळी काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याला न जुमानता प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली. यामुळे अनधिकृत मिळकतधारकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी अंतिम सुनावणी होणार आहे. या निर्णयावर अतिक्रमण निर्मुलन कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.

गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर सोमवारपासून कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी रात्री पाहणी करण्यात आली. आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाईचे नियोजन करण्यात आले. सोमवारी पहाटेपासूनच गांधीनगर परिसरातील कारवाईसाठी प्रशासनाची लगबग सुरू होती. सकाळी सहा वाजताच महापालिकेचे अधिकारी, अभियंते, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, कर्मचारी आणि पोलीस दल तावडे हॉटेल चौकात झाले. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तावडे हॉटेल परिसरात फेरीवाल्यांची धावपळ

तावडे हॉटेल चौकात अतिक्रमण निर्मुलनाची यंत्रणा पाहताच येथील फेरीवाल्यांची धावपळ सुरू झाली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारवाईला सुरुवात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. काही व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने त्याला दाद न देता आपली कारवाई सुरू ठेवली. या कारवाईसाठी तीन पथके तयार केली होती. प्रत्येक पथकात एक जेसीबी, दोन डंपर, गॅस कटरची यंत्रणा आणि सुमारे 200 कर्मचारी नियुक्त केले होते.

अतिक्रमणे हटवली

तावडे हॉटेल चौकापासून महामार्गालगत उभारण्यात आलेली अतिक्रमणे सर्वप्रथम हटविण्यात आली. त्यानंतर सरस्वती साडी डेपोजवळील दोन बांधकामे आणि समोरील एक बांधकाम पाडण्यात आले. अनेक ठिकाणी लोखंडी ंशेड, पत्रे, भिंती आणि व्यावसायिक वापरासाठी उभारण्यात आलेले अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. काही ठिकाणी गॅस कटरच्या मदतीने पत्र्याचे शेड कापून हटविण्यात आल्या. कारवाई थांबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मिळकतधारकांनी स्वत:हून साहित्य हलविण्यास सुरुवात केली. दिवसभरात 23 बांधकामे जमीनदोस्त करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गवळी, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील, प्रमोद बराले, चेतन आरमाळ, इस्टेट ऑफिसर शेखर साळोंखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, सर्व्हेअर दत्ता पारधी व खुशालचंद राजमाने उपस्थित होते.

22 होर्डिंग काढले
गांधीनगर परिसरात लावण्यात आलेली अनधिकृत होर्डिंगही या कारवाईत काढण्यात आले. दिवसभरात 22 होर्डिंग काढण्यात आले. कारवाई सुरू झाल्याचे समजल्यानंतर हार्डिंगधारकानी स्वत:हून होर्डिंग उतरविण्यास सुरवात केली.

घटनाक्रम
सन 2012 पासून गांधीनगर परिसरातील त्या जागेच्या मालकीवरून कोल्हापूर महापालिका व उचगाव ग्रामपंचायतीत वाद
– सन 2013 मध्ये महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरुध्द कारवाई सुरू
– दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाणी न्यायालयाची कारवाईस स्थगिती
– दि. 2 मे 2014 रोजी जिल्हा न्यायालयाने स्थगिती उठविली.
– याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
– दि. 22 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने उचगाव ग्रामपंचायतीची याचिका फेटाळली.
– उचगाव ग्रामपंचायतीची सर्वोच्च न्यायालयात याचिका
– दि. 22 एप्रिल 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा मनपाच्या बाजुने निकाल
– दि. 23 एप्रिल 2026 रोजी मिळकतींचे सर्वेक्षण
– सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मिळकतधारकांना नोटीस
– दि. 26 मे 2026 रोजी मिळकतधारकांना म्हणणे सादर करण्यास संधी
– दि. 2 जून रोजी मिळकती उतरून घेण्यासाठी मिळकतधारकांना नोटीस
-दि. 22 जून रोजी कारवाईस सुरुवात


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​