Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala | ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी प्रथमच दुहेरी मार्ग; वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय

पुणे :संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी (९ जुलै) आळंदीतून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार असून, यंदा प्रथमच पालखी सोहळा पारंपरिक आणि पर्यायी अशा दोन्ही मार्गांनी पुढे जाणार आहे. मुसळधार पाऊस, इंद्रायणीचा पूर आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
पालखी सोहळा प्रमुख तथा संस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पालखीसोबत रथा पुढील एक ते २७ आणि रथामागील १ ते २० क्रमांकाच्या दिंड्या पारंपरिक मार्गाने आळंदीतील इंद्रायणी पुलावरून पुण्याकडे मार्गस्थ होतील. त्यात प्रत्येकी 50 वारकरी असतील. मात्र उर्वरित सर्व दिंड्या, वारकरी, भाविक आणि नागरिकांनी चऱ्होली फाटा मार्गे चऱ्होली चौक येथे येऊन पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हिडिओ संदेशातही अॅड. उमाप यांनी वारकऱ्यांना प्रशासन आणि संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.निवेदनात पुढे म्हटले आहे की, पर्यायी मार्गाने येणाऱ्या दिंड्या चऱ्होली चौकातून पुढे पालखी सोहळ्यात सहभागी होतील. तसेच दिंड्यांची भोजनाची वाहनेही मॅगझिन चौक मार्गे फुलेनगर येथे पोहोचतील. त्यामुळे सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान समितीने केले आहे.
Source link



