Uncategorized

तपासणीदरम्यान सापडलेले पैसे आमचेच!

मंत्री सतीश जारकीहोळी यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

बेंगळूर : ईडीच्या तपासणीदरम्यान आमच्या घरी 2 कोटी रुपये रोख रक्कम सापडली आहे. हे पैसे आमचेच आहेत. नोटीस मिळाल्यावर आम्ही त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. गुरुवारी रात्री ईडीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही शंका असल्यास आणि नोटीस बजावली गेल्यास, मी त्यांचीही उत्तरे देईन. मला जी माहिती होती, ती दिली आहे. ही धाड नव्हती, तर केवळ तपासणी होती. तपासणीसाठी ईडीचे अधिकारी काही कागदपत्रे घेऊन आले होते. आमच्याकडूनही त्यांनी काही कागदपत्रे घेतली आहेत. ‘फेमा’ कायद्यांतर्गत काही कागदपत्रे दाखवून मला प्रश्न विचारण्यात आले. मी विदेशात अद्याप गुंतवणूक केलेली नाही. मात्र, विदेशात गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे. कायदेशीर आणि आरबीआयच्या मंजुरीसह अनेक परवान्यांची अजून आवश्यकता आहे, हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. माझ्याजवळ उपलब्ध असलेली माहितीच दिली. नोटीस मिळाल्यास पुढील तपशील देणार असल्याचे सांगितले, असे ते म्हणाले.

कारवाईमागे राजकीय संदर्भ!

ईडीने नोटीस बजावली असती तर मी उत्तरे दिली असती; छापे टाकण्याची गरज नव्हती. देशात माझ्यापेक्षा अनेक बडे नेते आहेत. या घटनेमुळे चर्चा सुरू झाली आहे. या कारवाईमागे राजकीय संदर्भ असल्याचे दिसून येते. सध्या ईडीचे अधिकारी तपासणी करून निघून गेले आहेत. आता ते पुढे काय भूमिका घेतात ते पाहूया, असे मंत्री जारकीहोळी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

…तर चौकशीला हजर राहणार!

ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेंगळूर, गोकाक आणि बेळगावसह अनेक ठिकाणी तपासणी केली. त्यांनी आम्हाला सहकार्य केले. आम्हीही त्यांना सहकार्य केले आहे. त्यांच्याकडून नोटीस येईल, तेव्हा मी चौकशीसाठी हजर राहीन, असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

भाजपमध्ये ‘मोठे मासे’ आहेत

ईडी काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत असल्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते. मला सर्वात शेवटी लक्ष्य केले जाईल, अशी माझी समजूत होती. पण आमचा क्रमांक आधी लागला. आमच्याकडून कदाचित काही किरकोळ चुका झाल्या असतील; कोणीही परिपूर्ण नसते. मात्र, भाजपमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी माझ्यापेक्षा खूप मोठ्या चुका केल्या आहेत. मात्र, ईडीने ‘मोठ्या माशांकडे’ दुर्लक्ष केले आहे. देशभरात काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांविऊद्ध ईडी, प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात आहेत. हा विषय सध्या देशभर चर्चेचा ठरला आहे, असे त्यांनी सांगितले.

ईडीकडे आठ जणांची ‘टार्गेट लिस्ट’

ईडीची कारवाई नुकतीच सुरू झाली आहे. ते हे प्रकरण कुठपर्यंत नेतात ते पाहूया. निवडणुकांपर्यंत किंवा त्यानंतरही ते हा मुद्दा घेऊन जातील का, हे पाहावे लागेल. आता तपास नेमकी कसा केला जातो, याची प्रतीक्षा आहे. आमच्या पक्षाध्यक्षांनी ईडीच्या यादीत आठ जणांचा समावेश आहे, असे सांगितले होते. आता पुढे काय होते, याची आपण वाट पाहूया, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​