जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत भोसले सैनिक स्कूलची विजयी भरारी; मुलींच्या संघाला विजेतेपद; कोल्हापूर विभागीय फेरीसाठी निवड

मालवण : जय गणेश स्कूल, मालवण येथे आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात भोसले सैनिक स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. या विजयी संघाची कोल्हापूर विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे.
विजयी संघात दहावीतील अद्विता दळवी, नववीतील श्रावणी सोमवंशी तसेच आठवीतील विधी पटेल, श्रावणी गुरव आणि किंजल लोके यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट समन्वय आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघाला विजेतेपद मिळवून दिले.
वैयक्तिक निवड चाचणीतही विद्यार्थ्यांची चमक
वैयक्तिक निवड चाचणीतही भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. दहावीतील अब्दुर रहमान मोहम्मद याची 19 वर्षांखालील मुलांच्या गटातून, तर नववीतील लिखित भानुशाली याची 17 वर्षांखालील मुलांच्या गटातून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर आणि एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई तसेच प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आगामी कोल्हापूर विभागीय फेरीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
Source link



