Uncategorized

सातार्डा-भटवाडीत बिबट्याचा युवतीवर जीवघेणा हल्ला; दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

सातार्डा : सातार्डा-भटवाडी येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या युवतीवर बिबट्याने झडप घालून हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तन्वी प्रमोद कवठणकर ही युवती जखमी झाली असून, तिच्या उजव्या पायावर बिबट्याच्या नख्यांमुळे जखमा झाल्या आहेत. तिच्यावर शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कॉलेजमधून सुटल्यानंतर तन्वी कवठणकर ही दुचाकीस्वार निलेश सातार्डेकर यांच्यासोबत घरी जात होती. घरापासून काही अंतरावर असताना बिबट्याने दुचाकीवर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात तन्वी जखमी झाली. मात्र, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.

जखमी तन्वीला नातेवाईक आणि ॲड. प्रसाद आसोलकर यांच्या मदतीने तातडीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, निलेश सातार्डेकर हे घरी जात असताना त्यांना यापूर्वीही बिबट्या परिसरात दिसला होता.

वनविभागाला तत्काळ माहिती

या घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनी तत्काळ वनविभाग तसेच वनविभागाच्या शीघ्र कृती दलाचे प्रमुख रामचंद्र रेडकर यांना दिली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा वनरक्षक बालाजी रणगिरे घटनास्थळी दाखल झाले.

वनरक्षक बालाजी रणगिरे, तानाजी कुंभार आणि प्रकाश मोहिते यांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी तन्वीची भेट घेत तिची विचारपूस केली. यावेळी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष कवठणकर आणि निलेश सातार्डेकर उपस्थित होते. गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनीही रुग्णालयात जाऊन तन्वीची विचारपूस करून तिला धीर दिला.

पंचक्रोशीत बिबट्याची दहशत

सातार्डा पंचक्रोशीत बिबट्याचा उपद्रव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात बिबट्यांकडून गुरे आणि कुत्र्यांवर हल्ले होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच बिबट्याचे बछडे रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर परिसरात नागरिकांची वर्दळ वाढली असताना लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्याने युवतीवर हल्ला केल्याने वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

‘वनविभाग बळी जाण्याची वाट बघतोय का?’

बिबट्याच्या वाढत्या दहशतीवर जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी संताप व्यक्त केला. “सातार्डा पंचक्रोशीत बिबट्यांचा उपद्रव वाढला असून, गुरे आणि कुत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. आता कॉलेज युवतीवरही जीवघेणा हल्ला झाला आहे,” असे त्यांनी सांगितले.

जखमी तन्वी कवठणकर हिला वनविभागाने नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. बिबट्याला पकडण्याची मागणी वारंवार करूनही ठोस कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. “बिबट्याच्या हल्ल्यात एखादा बळी गेल्यानंतरच वनविभाग कारवाई करणार आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​