Uncategorized

करिअर कट्टातून युवा उद्योजकांची घडण; कर्ले महाविद्यालयात ‘मैत्री’ अगरबत्ती स्टार्टअपचा शुभारंभ;बिझनेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उद्योजकतेकडे भरारी

देवगड / प्रतिनिधी : करिअर कट्टाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बिझनेस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘मैत्री’ हा स्वतःचा स्टार्टअप सुरू केल्याची बाब अभिमानास्पद असून, शिक्षणाबरोबरच उद्योजकतेचे धडे घेत विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता, कौशल्य, संघभावना, मेहनत आणि व्यावसायिक दृष्टिकोन कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष गणपत तावडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत बिझनेस क्लबच्या माध्यमातून ‘मैत्री’ स्टार्टअपचा उद्घाटन सोहळा शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयात नुकताच पार पडला. गणपत तावडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी यांनी सांगितले की, करिअर कट्टा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व्यावसायिकतेची दिशा मिळत आहे. शिक्षणातून ज्ञान, कौशल्यातून आत्मविश्वास आणि उद्योजकतेतून स्वावलंबन निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला उद्योजकतेची दिशा देणारा हा टप्पा त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी दाखविलेले स्वावलंबनाचे धाडस इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्ले महाविद्यालयाच्या ‘मैत्री अगरबत्ती’ या स्टार्टअपचा शुभारंभ ओम गणेश मंदिरात श्रींच्या चरणी उत्पादन ठेवून विजयकुमार कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी करिअर कट्टा उपक्रमातून भविष्यात अनेक युवा उद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त केला. नवतंत्रज्ञान आणि नवउद्योजकतेच्या माध्यमातून राष्ट्राच्या जडणघडणीत विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ व्यवसाय सुरू करण्याचा अनुभव मिळणार नसून, नियोजन, उत्पादन, विपणन, आर्थिक व्यवस्थापन, संघभावना आणि ग्राहकांशी संवाद अशा विविध व्यावसायिक कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यात उद्योजकतेची मानसिकता विकसित होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमास शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम, संचालक हेमंत देसाई, अमित साटम, मानद अधीक्षक सुधीर साटम, प्रकाश धोपटे, विष्णू पाटणकर, नागेश पवार, शिरगाव हायस्कूल शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, प्राचार्य समीर तारी, करिअर कट्टा समन्वयक प्रा. अक्षता मोंडकर, सहाय्यक प्रा. कोमल पाटील, बिझनेस क्लब अध्यक्ष विराज लाड, क्लबचे सर्व सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्दी सावळे यांनी केले. आभार सृष्टी पटेल यांनी मानले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​