Uncategorized

मतदार यादी पुनरिक्षणाचा विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी घेतला आढावा; कणकवलीतील मतदान केंद्रांसह ग्रामपंचायती, घरकुल प्रकल्पाची पाहणी

कणकवली / प्रतिनिधी : कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात करत कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी जानवली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच कलमठ ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पाचीही पाहणी केली.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत अगरवाल आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. या दौऱ्यात मतदान केंद्रांची पाहणी, मतदार नोंदणी कार्यालयातील कामकाजाचा आढावा, अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

दौऱ्याच्या सुरुवातीला जानवली येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन रुबल अगरवाल यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी 268 कणकवली विधानसभा मतदारसंघातील जानवली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथील 261 व 262 क्रमांकाच्या मतदान केंद्रांची पाहणी केली. या केंद्रांवर एकूण 1,139 मतदार असून उपलब्ध सुविधा, मतदार नोंदणी तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत शालेय शिक्षण आणि पोषणाबाबतही चर्चा करण्यात आली. मतदार यादी पुनरिक्षणाची प्रक्रिया अचूक व प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.

यानंतर अगरवाल यांनी कलमठ ग्रामपंचायतीला भेट देऊन विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेत त्यांनी पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सरपंच संदीप मेस्त्री यांनी त्यांचे स्वागत करून ग्रामपंचायतीच्या कामांची माहिती दिली.

त्यानंतर त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पाची पाहणी केली. ग्रामपंचायतीने या घरकुल प्रकल्पाला ‘पंडित दीनदयाळ संकुल’ असे नाव दिले आहे. अगरवाल यांनी संकुलाची पाहणी करून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी अपर आयुक्त फरोग मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसीलदार शीतल जाधव यांच्यासह महसूल व निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते. जानवली ग्रामपंचायत सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थही उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​