आईने पोटच्या तीन लेकरांना खाली ढकलले, नंतर स्वतःही मारली उडी; ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरील घटनेने एकच खळबळ

उमरगा : ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत आईसह तिच्या 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुली गंभीर जखमी झाल्या. दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील एका बुरुजाजवळ ही घटना घडली. यामुळे नळदुर्ग परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी मनोहर पौळ (वय 28, रा. अंबुलगा, ता. निलंगा, जि. लातूर; माहेर व्हंताळ, ता. उमरगा) या गुरुवारी आपला मुलगा अजिंक्य (वय 6) आणि जुळ्या मुली क्रांती व वीरा (वय अडीच वर्षे) यांच्यासह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या तीनही मुलांना बुरुजावरून खाली ढकलल्यानंतर स्वतःही उडी घेतली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.
दरम्यान, जखमी झालेल्या क्रांती आणि वीरा यांना तातडीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही मुलींना पुढील उपचारासाठी धाराशिव येथे हलविण्यात आले. त्यापैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ तसेच व्हंताळ गावचे सरपंच माधव जाधव यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे अंबुलगा, व्हंताळ आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होत्या. त्या आणि त्यांचे पती मनोहर पौळ हे पोलीस भरतीची तयारी करीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नळदुर्ग पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, वृत्त लिहिपर्यंत प्रकरणाची अधिकृत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Source link



