राम मंदिर ट्रस्ट सीईओपदी जितेंद्र मिश्रा

गेल्यावर्षीच्या ‘सिंदूर’ अभियानात होता सहभाग : तीन नव्या विश्वस्तांचीही वर्णी
नवी जबाबदारी अभिमानास्पद
- राम मंदिराच्या व्यवस्थापनाचे आणि व्यवहारांचे उत्तरदायित्व आता मिश्रांवर
- भारतीय वायुदलात अनेक उच्च पदांसह सर्वोच्च पदावरही उत्कृष्ट कामगिरी
- नव्या उत्तरादायित्वाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यासाठी मिश्रा सज्ज
वृत्तसंस्था/अयोध्या
भारतीय वायुदलाचे निवृत्त अधिकारी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची अयोध्येतील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्या देशाला धडा शिकविण्यासाठी भारताने साकारलेल्या ‘सिंदूर’ अभियानात जितेंद्र मिश्रा यांचे मोलाचे योगदान आहे. ते काही काळातच आपले नवे पद स्वीकारतील, अशी माहिती राम मंदिर न्यासाकडून देण्यात आली आहे.
जितेंद्र मिश्रा हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पहिले स्थायी मुख्य कार्यकारी अधिकारी होणार आहेत. या पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध न्यासाने गेल्या काही दिवसांपासून चालविला होता. यासाठी आवेदनपत्रे मागविण्यात आली होती. आलेल्या आवेदन पत्रांमधून तीन मान्यवरांची नावे निवडण्यात आली. त्या तिघांपैकी आता निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली आहे.
दान अपहार प्रकरणाची पार्श्वभूमी
तीन महिन्यांपूर्वी श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील देणग्यांच्या अपहाराचे प्रकरण समोर आले होते. दानपेटीत भक्तांनी अर्पण केलेल्या पैशाच्या काही भागाचा, या पैशांची गणना करणाऱ्यांनी अपहार केला होता. त्या प्रकरणात एफआयआर नेंद करण्यात आला असून काही जणांवर कारवाई केली जात आहे. चौकशीसाठी विशेष तपास दलाची स्थापनाही करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना अन्वेषण दलासंबंधी केल्या आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी राम मंदिर न्यायाने आता पावले उचलण्यास प्रारंभ केला असून काही विश्वस्तांनीही पदत्याग केला आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
तीन नवे विश्वस्त नियुक्त
राम मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या न्यासात तीन नव्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे महेश भागचंदका, निर्मला यादव आणि मदनमोहन पांडे अशी आहेत. महेश भागचंदका हे दिल्ली येथील एक उद्योजक असून ते विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांचे नातेवाईक आहेत. निर्मला यादव या उत्तर प्रदेशातील शिकोहाबाद येथे वास्तव्य करणाऱ्या कार्यकर्त्या असून मदनमोहन पांडे हे अयोध्येत वास्तव्य असणारे एक नागरिक आहेत. पूर्वीचे विश्वस्त बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा (राजा अयोध्या) यांचे निधन झाल्याने ते स्थान रिक्त होते. अपहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर न्यासाचे महासचिव चंपत राय आणि एक विश्वस्त अनिल मिश्रा यांनी त्यांच्या पदांचा त्याग केला होता. या तीन रिक्त स्थानांवर आता या नव्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
जितेंद्र मिश्रा यांचा देदिप्यमान कार्यकाळ
राम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आलेले जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय वायुदलात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. युद्ध विमानांचे चालक म्हणून त्यांनी त्यांच्या सेवेला प्रारंभ केला. वायुदलातील विविध उच्च पदांवर सेवा देऊन ते 30 एप्रिल 2026 या दिवशी निवृत्त झाले. त्यांनी वायुदलात जवळपास 40 वर्षे इतका प्रदीर्घ काळ सेवा दिली आहे. फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमोडोर अशी पदोन्नती घेत ते 2019 मध्ये एअर व्हाईस मार्शल बनले. नंतर 2023 मध्ये एअर मार्शल आणि अखेरीस एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदावरून ते 2026 मध्ये निवृत्त झाले. आता त्यांच्यावर अयोध्येत रामजन्मभूमी स्थानी साकारलेल्या श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व देण्यात आले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पद असून मी माझ्या सर्व शक्तीनिशी हे पद योग्यरित्या सांभाळणार आहे. या पदासाठी नियुक्ती हेणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
Source link



