गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड

नवी दिल्ली : गोव्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे मंगळवारी सकाळी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमान पुन्हा गोव्यात उतरवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
इंडिगोचे 6E2102 हे विमान मंगळवारी सकाळी गोव्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. नियोजित वेळेपेक्षा सुमारे पाच मिनिटे उशिराने, सकाळी 9.15 वाजता विमानाने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे लक्षात आले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमान परत गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले आणि तेथे सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान सकाळी 11.45 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी काही काळ ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली होती. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. इंजिनमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, याची तपासणी केली जात आहे.
Source link



