Uncategorized

गणेशोत्सव तोंडावर, आचऱ्यात वीजपुरवठ्याचा बोजवारा; सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

आचरा प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा गावातील वाढत्या वीज समस्यांवर सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील विविध वाड्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, वीजवाहिन्यांवरील झाडी सफाईचे कामही अपेक्षित पद्धतीने झालेले नाही. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा सरपंच फर्नांडिस यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी वीज वितरण, आरोग्य, एसटी महामंडळ, बांधकाम विभाग, बंदर विभाग आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

वीज समस्यांवर सरपंचांचा संताप

आचरा गावात सध्या कोणत्या ना कोणत्या वाडीत दररोज वीजपुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी बैठकीत सांगितले. वीजवाहिन्यांवर वाढलेली झाडी अद्याप पूर्णपणे हटविण्यात आलेली नाही. गणेशोत्सव तोंडावर असताना पूर्वीपेक्षा वीज समस्या अधिक गंभीर झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

वीज वितरणचे कार्यालय आचरा येथे असतानाही संबंधित अधिकारी बैठकीस उशिरा उपस्थित राहिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनीही नाराजी व्यक्त केली.

गावात वीज समस्या गंभीर असताना वीज वितरण कंपनीकडून वीज बिल वसुलीवर भर दिला जात असल्याबद्दल सरपंचांनी नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवापर्यंत वीज बिल वसुली करू नये तसेच कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी त्यांनी केली. वसुलीसाठी तगादा लावल्यास किंवा कनेक्शन तोडल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीस वीज वितरण विभाग जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून बांधकाम विभागाला खडे बोल

बैठकीत आचरा परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची वर्दळ वाढणार असल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच फर्नांडिस यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

दरम्यान, आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी रिक्षा संघटना, लक्झरी चालक-मालक तसेच एसटी वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.

बैठकीला सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, महेश राणे, देवस्थान समितीचे संजय मिराशी, कपिल गुरव, पत्रकार परेश सावंत, व्यापारी संघटनेचे अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, दिनेश कांबळी, विनायक सावंत, सदाशिव मयेकर, आनंद राणे, दिनेश साळकर, संजय आचरेकर, रोहित मिराशी, चंद्रशेखर तोंडवळकर, विष्णू भाटकर, एकनाथ पाटील, प्रशांत गावकर, दीपक घाडी यांच्यासह वीज वितरण विभागाचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​