कुडाळमध्ये ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहीम; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग;नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

कुडाळ : शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी राज हॉटेलजवळील अंडरपास परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ’ हा संदेश देत रस्ते, अंडरपास आणि परिसरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, या भावनेतून युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी श्रमदान केले.
नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेची सवय अंगीकारणे यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या मोहिमेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मंदार शिरसाट, तालुका प्रवक्ते बाळा पावसकर, युवा सेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, तसेच अमित राणे, गुरु गडकर, सागर भोगटे, रोहन शिरसाट, विनय पालकर, शैलेश काळप, रवी राऊळ यांच्यासह अनेक नागरिक व युवक सहभागी झाले होते.
Source link



