राष्ट्रीय परिसंवादासाठी डॉ. ज्योती तोरसकर यांची जेएनयू, दिल्ली येथे प्रतिनिधी म्हणून निवड

मालवण : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 व3 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे ‘Life and Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित राष्ट्रीय परिसंवादासाठी मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका आणि इतिहास संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांनी अधिकृत पत्राद्वारे डॉ. तोरसकर यांना परिसंवादास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य, विचार, प्रशासन, राष्ट्रनिर्मितीतील योगदान तसेच समकालीन भारतावरील त्यांचा प्रभाव या विविध पैलूंवर या परिसंवादात देशभरातील विद्वान, संशोधक आणि अभ्यासक विचारविनिमय करणार आहेत.
डॉ. तोरसकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीशी संबंधित ‘मोरयाचा धोंडा’ या ऐतिहासिक स्थळाचा संशोधनात्मक अभ्यास केला असून, त्यावर आधारित संशोधनपर पेपर तयार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या प्रारंभी मोरयाचा धोंडा येथे केलेले गणेशपूजन व सागरपूजन, त्यामागील ऐतिहासिक संदर्भ, स्थानिक पुरावे, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व यांचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे.
किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. या प्रयत्नांसोबतच डॉ. तोरसकर यांच्या सागरी किल्ल्यांच्या इतिहासावरील Ph.D. संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळणे ही महत्त्वपूर्ण फलश्रुती मानली जात आहे.
मोरयाचा धोंडा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास, स्थानिक श्रद्धा, सागरी परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दूरदृष्टीशी असलेला संबंध या विषयांचा अभ्यास हेरिटेज टुरिझमच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या ऐतिहासिक स्थळाचे संशोधन, संवर्धन आणि योग्य पद्धतीने सादरीकरण झाल्यास मालवणच्या सांस्कृतिक पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच इतिहास संशोधनाची वाटचाल करणाऱ्या डॉ. तोरसकर यांच्या या सहभागामुळे मालवण, सिंधुदुर्ग किल्ला आणि मोरयाचा धोंडा यांचा इतिहास देशाच्या राजधानीतील प्रतिष्ठित शैक्षणिक व्यासपीठावर पोहोचणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि इतिहासप्रेमी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Source link



