गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडीतील खड्डे बुजवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशार

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तातडीने पावसाळी डांबरीकरण करून बुजवावेत, तसेच विविध पाईपलाईनच्या कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे केली.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून या काळात शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र, सध्या शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनच्या कामांसाठी खोदण्यात आलेले चर व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत, त्याठिकाणी योग्य पद्धतीने खडीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
या समस्येबाबत यापूर्वीही प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याधिकाऱ्यांना भेटले. यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, सुप्रिता धारणकर, भारती परब आदी उपस्थित होत्या.
मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही शिवसेनेने स्पष्ट केले.
Source link



