हॉकी कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ओडिशा, मध्यप्रदेशचे दमदार विजय

वृत्तसंस्था, पुणे
येथे सुरू असलेल्या 16 व्या हॉकी कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत चंदीगड, ओडिशा आणि मध्यप्रदेशने दमदार विजय नोंदवले. तर डिव्हिजन ए मधील अटीतटीच्या लढतीत मणिपूरने महाराष्ट्रावर निसटता विजय मिळविला.
चंदीगडने पंजाबचा 3-1 असा पराभव केला. सामन्याचा पहिला हाफ गोलशून्य राहिल्यानंतर 33 व्या मिनिटाला दीक्षाने पहिला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानतंर अवघ्या एका मिनिटाने म्हणजेच 34 व्या मिनिटाला रविनाने गोल करत चंदीगडची आघाडी दुप्पट केली. 40 व्या मिनिटाला कौर जैसमीनने पंजाबसाठी एक गोल परत केला. परंतु 46 व्या मिनिटाला चौहान प्रियाने गोल करत चंदीगडची दोन गोलची आघाडी पुन्हा कायम राखली आणि विजयावर शिक्कामोर्तबल केले. पूल बी. मध्ये ओडिशाने वर्चस्व गाजवत बंगालचा 6-0 असा धुव्वा उडवला. कर्णधार द्रुपती नाईकने 10 व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि 47 व्या मिनिटाला पुन्हा गोलची नोंद केली. अजिता एक्काने 29 व्या मिनिटाला तर सोनाली एक्काने 30 व्या मिनिटाला गोल केले. बिनाती मिन्झने 44 व्या मिनिटाला आघाडी वाढवली आणि भोई डोलीने 49 व्या मिनिटाला गोल करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
पूल डी मध्ये मध्यप्रदेशने आणखी एक दमदार विजय मिळवत हिमाचलचा 6-0 असा पराभव केला. तन्वीने 12 व्या मिनिटाला गोल करून सुरुवात केली. त्यानतर काजलने 19 व्या आणि 26 व्या मिनिटाला दोन गोल केले. 52 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत काजलने आपली हॅट्ट्रीक पूर्ण केली. तन्वीने 58 व्या मिनिटाला आपला दुसरा गोल नोंदवला तर कुदरतने 59 व्या मिनिटाला गोल करत संघाच्या गोलसंख्येची पूर्तता केली.
पूल सी मध्ये मणिपूरने हॉकी महाराष्ट्रावर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या सामन्यात सल्लू पुखरामबम ही प्रमुख आकर्षण ठरली. तिने 21 व्या आणि 43 व्या आणि 47 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रीक साधली आणि मणिपूरला विजय मिळवून दिला. महाराष्ट्राने रुबी राठोड (49 व्या मिनिट) आणि कर्णधार तनिष्का संजय शिंदे (53 व्या मिनिट) यांच्या गोलद्वारे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मणिपूरने आपली आघाडी टिकवून ठेवत तिन्ही गुण मिळविले.
Source link



