झारखंड विद्यार्थ्यांची विधानसभेला धडक

पोलिसांकडून लाठीमार, अश्रूधूर, अनेक आंदोलक जखमी, आंदोलन न थांबविण्यावर विद्यार्थी ठाम
► वृत्तसंस्था
रांची (झारखंड)
झारखंडमधील शिक्षण व्यवस्थेत माजलेली भ्रष्टाचाराची बजबजपुरी आणि प्रश्नपत्रिकाफुटीच्या अनेक घटनांविरोधात गेले 16 दिवस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधानसभेला धडक देऊन आपल्या निर्धार दाखवून दिला आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर विधानसभेवर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी पूर्वीच दिला होता. चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतरही तोगडा न निघाल्याने सोमवारी आंदोलकांनी थेट विधानसभेवर मोर्चा नेला. या मोर्चात हजारो विद्यार्थी आणि परीक्षार्थींचा समावेश असल्याचे दिसून आले. रात्री उशीरापर्यंत अनेक आंदोलन विधानसभा परिसरातच ठाण मांडून असल्याची माहिती आहे. मोर्चा असफल करण्यासाठी पोलिसांनी दोन वेळा लाठीमार केला. तसेच अश्रूधुराची कैक नळकांडी फोडण्यात आली. तरीही अनेक विद्यार्थी विधानसभा परिसरात पोहचल्याचे दिसून आले. विधानसभा परिसरातही पोलीसांनी लाठीमार केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या मोर्चाला ‘विधानसभा घेराव मोर्चा’ असे संबोधण्यात आले आहे. त्याचे आयोजन ‘जेपीएससी-जेएसएससी सुधारणा मोर्चा’ या संघटनेकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अत्यंत शांतपणे मोर्चा काढला असूनही पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला असे प्रतिपादन आंदोलनाच्या आयोजकांनी केले आहे. अनेक विद्यार्थी या लाठीमाराच्या घटनांमध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून उपोषणही करत राहण्याचे प्रतिपादन केले आहे. झारखंड सरकारने विद्यार्थ्यांशी केलेली आतापर्यंतची चर्चा अपयशी ठरली आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांसंबंधी संताप व्यक्त
विद्यार्थ्यांनी अत्यंत शांतपणे आंदोलन चालविलेले आहे. मोर्चातही पोलिसांवर कुणीही हल्ले केलेले नाहीत. दगडफेकीची एकही घटना घडलेली नाही. या मोर्चापासून आणि आंदोलनापासून समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दक्षतापूर्वक दूर ठेवण्यात आले आहे. तरीही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने मोर्चावर हेतुपुरस्सर लाठीमार करुन भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री सोरेन यांच्याविषयी त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला. विद्यार्थ्यांचा संताप राज्य सरकारला भोवेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भर पावसातही आंदोलक दृढ
मोर्चा विधानसभेपर्यंत येईपर्यंत जोरदार पावसाला प्रारंभ झाला. तथापि, मोर्चापासून कोणताही आंदोलक दूर झाला नाही. भर पावसातही विद्यार्थ्यांनी आपला निर्धार राखल्याचे दिसून आले. पावसातच त्यांच्यावर पोलीसांनी दोन-तीन वेळा लाठीमार केल्याच्या घटना घडल्या. विधानसभा परिसरात विद्यार्थ्यांच्या पोलिसांशी झटापटी झाल्या. त्यांच्यातही अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
बॅरीकेडस् निरुपयोगी
विधानसभेपर्यंत विद्यार्थ्यांना जाता येऊ नये, म्हणून मार्गात पोलिसांनी अनेक स्थानी बॅरीकेडस् उभी केली होती. तथापि, ती ओलांडून मोर्चेकऱ्यांनी विधानसभेपर्यंत धडक मारल्याचे दिसून आले. विधानसभा परिसराभोवतीही संरक्षण बॅरीकेडस्च्या भिंती रचण्यात आल्या होत्या. तथापि, अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील उड्या मारुन विधानसभा परिसरात प्रवेश करण्यात यश मिळविले. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तथापि, विद्यार्थ्यांच्या शक्तीसमोर पोलिसांचे बळ तोकडे पडल्याचे दिसून आले. दुपारी साडेचारच्या आसपास विद्यार्थ्यांनी विधानसभा परिसरात प्रवेश केल्यानंतर अनेक विद्यार्थी रात्रीपर्यंत विधानसभा परिसरातच होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
आज मंगळवारी अभाविपचा मोर्चा
शांततेने होत असलेल्या मोर्चावर पोलिसांनी विनाकारण लाठीमार केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज मंगळवारी झारखंड विधानसभेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी निर्दयपणे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तथापि, देशातील संपूर्ण विद्यार्थी शक्ती या आंदोलकांच्या पाठीशी असून आंदोलकांना माघार घ्यावयास लावणे राज्य सरकारसाठी अशक्य आहे, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सोमवारी संध्याकाळी प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थी अटकेत
मोर्चातील आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या उपयोगाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात अटकसत्रही चालविले आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत 600 हून अधिक आंदोलकाना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या कोणावरही पोलीस कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी आयोजकांनी केली.
देवेंद्र महातो समाविष्ट
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी गेले 12 दिवस अनिश्चितकालीन उपोषण करणारे समाजिक कार्यकर्ते देवेंद्र महतो यांनीही विधानसभेवरील मोर्चात सहभाग घेतला आहे. मोर्चा जवळपास विधानसभेपर्यंत जाईपर्यंत ते मोर्चात सहभागी होते. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलकांच्या उत्साहात अधिकच भर पडली.
राहुल गांधी यांचे दुटप्पी वर्तन
संसदेवरील मोर्चावर लाठीमार झाल्यानंतर केंद्र सरकारवर तुटून पडणारे राहुल गांधी आता कोठे आहेत, अशी खोचक पृच्छा भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली आहे. गांधी यांनी झारखंडमधील आंदोलनासंबंधात एक अवाक्षरही काढलेले नाही. यातून त्यांचा दांभिकपणा उघडा पडला आहे. या देशातील सूज्ञ जनता त्यांना याचे उत्तर विचारेलच. एकंदरीतच, विरोधी पक्षांचा पर्दाफाश झाला आहे, अशा अर्थाची टीका सूर्या यांनी केली आहे.
लाठीमारानंतर अश्रूधूर ?
आंदोलकाना पांगविण्यासाठी प्रथम पोलिस अश्रूधुराचा उपयोग करतात. तरीही जमाव हटला नाही, तर लाठीमार करण्यात येतो. पण झारखंडमध्ये मोर्चावर एकदम लाठीमारच करण्यात आला आणि नंतर अश्रूधुराचा उपयोग करण्यात आला. यावरुन पोलिसांनी निर्दयपणे स्थिती हाताळल्याचे दिसून येते, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाचे माहिती तंत्रज्ञान कक्ष प्रमुख अमित मालवीय यांनी केली.
बळाचा उपयोग अयोग्य
झारखंडमधील मोर्चावर लाठीमार झाल्याच्या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांविरोधात बळाचा उपयोग करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा समवेत काँग्रेसचाही सत्तेत सहभाग आहे. आता तेथे या बळाच्या उपयोगाविरोधात राहुल गांधी काय कृती करणार, ते समजेलच, अशी टीका आंदोलकांपैकी काहींनी केली.
जंतरमंतर ते जयपाल सिंग मुंडा स्टेडियम
जंतरमंतरवरही नीट प्रश्नप्रत्रिकाफुटीसंबंधी आंदोलन झाले होते. संसदेवर मोर्चाही काढण्यात आला होता. तथापि, सोमवारी निघालेल्या झारखंडमधील मोर्चात आणि संसदेवरील मोर्चात मोठा गुणात्मक फरक आहे, तो पुढीलप्रमाणे स्पष्ट होत आहे…
- जंतरमंतरवरील आंदोलनात देशविरोधी शक्तींचा मोठा सहभाग स्पष्टपणे दिसून येत होता. झारखंडमधील आंदोलनात समाजकंटकांना दूर ठेवण्यात आले.
- जंतरमंतरवरील आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अत्यंत अश्लील आणि बीभत्स अशा स्वरुपाची रील्स तयार करुन ती प्रसारीत करण्यात आली. झारखंडमधील आंदोलनात असा कोणताच घृणास्पद प्रकार घडलेला नाही.
- जंतरमंतरवरील आंदोलनात पोलिसांवर हल्ले करण्यात आले. दगडफेकही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. झारखंडमधील आंदोलनात पोलिसांवर दगडफेकीचा एकही प्रकार घडला नाही.
- जंतरमंतरवरील आंदोलनात पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर त्यांनी लाठीमार केला. झारखंडमधील आंदोलनात मात्र, अशी दगडफेक किंवा हल्ले झालेले नसतानही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीमार, अश्रूधुराचा उपयोग केला आहे.
रांचीत दिवसभरात
11.00 वाजता : जयपालसिंग मुंडा स्टेडियमवरुन विधानसभा मोर्चाला प्रारंभ
12.00 वाजता : प्रारंभी मोर्चा शांततेत, नंतर पोलिसांकडून लाठीमाराचा प्रयोग
2.00 वाजता : मोर्चा विधानसभेच्या परिसरानजीक, कडेकोट पोलीस बंदोबस्त
3.30 वाजता : विधानसभा बॅरीकेडना ओलांकडून आंदोलक विधानसभेकडे
4.30 वाजता : विधानसभेनजीक मोर्चा आल्यानंतर पुन्हा पोलिसांचा लाठीमार
6.00 वाजता : लाठीमार, अश्रूधूर, पाऊस यांना न जुमानता आंदोलक अग्रेसर
7.00 वाजता : बॅरीकेडची भिंत ओलांडून आंदोलक विधानसभा परिसरात
8.00 वाजता : अनेक आंदोलकांचे विधानसभा परिसरातच ठिय्या आंदोलन
Source link



