पाऊस, भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रेला ब्रेक

वृत्तसंस्था
श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. मुसळधार पावसानंतर यात्रामार्गात झालेल्या भूस्खलनामुळे शनिवारी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून यात्रेकरूंची कोणतीही नवीन तुकडी काश्मीर खोऱ्यात पाठवता आली नाही. सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग-44 चा काही भाग सध्या बंद ठेवण्यात आला आहे. 250 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग काश्मीर खोऱ्याला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा एकमेव बारमाही रस्ता आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावरील वाहतूक बंद होती. गेल्या आठवड्यातील पावसामुळे खराब झालेल्या उधमपूर जिह्यातील लाढा-समरोली परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. शुक्रवारी यात्रेकरूंचा ताफा गेल्यानंतर दुरुस्तीसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतरही पाऊस सुरू असल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळे वाहनांना त्यावरून जाणे धोकादायक ठरत आहे.
Source link



