‘सागरी हद्दी’त पहारा कोण देणार?

केंद्र व राज्याच्या वेगवेगळ्या बंदी कालवधीमुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये नाराजी : 12 सागरी मैलापलिकडील मासेमारीस सुरुवात
दापोली- वार्ताहर
समुद्रकिनाऱ्यापासून 12 सागरी मैल अर्थात राज्याच्या सागरी जलक्षीक्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू आहे. तर 12 सागरी मैलापलिकडील राष्ट्रीय सागरी हद्दीतील मासेमारीला आज 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या वेगवेगळ्या मासेमारी बंदी कालावधीमुळे मच्छीमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा सर्वाधिक फायदा अवैध एलईडी व पर्ससीन नौका तसेच परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सना होण्याची दाट शक्यता स्थानिक पारंपरिक मच्छीमारांकडून वर्तवली जात आहे.
मासेमारीच्या नियमांबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे गोंधळ अधिक वाढला आहे. ज्या नौकांनी ईईझेड अर्थात 12 सागरी मैलापलिकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारीसाठी ‘अॅक्सेस पास’ घेतला आहे, त्यांनाच राष्ट्रीय सागरी हद्दीत मासेमारी करण्याची परवानगी असणार आहे. विना अॅक्सेस पास मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य विभागाकडून देण्यात आला आहे. ज्या नौकाधारकांकडे वैध अॅक्सेस पास असतील अशाच नौकांना समुद्रावरून परत आल्यानंतर किनाऱ्यावर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कारवाई थेट समुद्रात की किनाऱ्यावरून?
केंद्र आणि राज्याचा मासेमारी बंदी कालावधी वेगवेगळा असल्याने 1 ऑगस्टपासून जर राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात अवैध मासेमारी केली गेली तर त्याविरोधात मत्स्य विभागाकडून थेट समुद्रात कारवाई केली जाणार की, संबंधित नौका किनाऱ्यावर आल्यानंतर कारवाई केली जाणार, हा सवाल उपस्थित होतो आहे. किनाऱ्यावर आलेला नौकाधारक आपण राष्ट्रीय हद्दीत मासेमारी करून आलोय, असेदेखील सांगू शकतो. मग अशावेळी मत्स्य विभाग संबंधितावर कारवाई करू शकणार का, याचे उत्तर मत्स्य विभागाने द्यावे अशी मच्छीमारांची मागणी आहे. हर्णै येथील मच्छीमार सोमनाथ पावसे म्हणाले, 12 सागरी मैलापलिकडील जलक्षेत्रात मासेमारीची परवानगी मिळाली आहे. पण 12 सागरी मैलाच्या आतमध्ये जर मासेमारी केली गेली तर त्यासाठी कोणती उपाययोजना आहे, हे शासनाने मच्छीमारांना सांगावे. बंदी कालावधी एकसमान नसल्याने ‘पारंपारिक मच्छीमार उपाशी व धनदांडगे मच्छीमार तुपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका पावसे यांनी केली आहे.
पारपंरिक मच्छीमारांचे नुकसान होणार
शासनाच्या या धोरणामुळे अनेक अडचणींचा सामना स्थानिक मच्छीमारांना करावा लागणार आहे. परराज्यातील आणि राज्यातील मोठ्या नौका मासळी पळवतील व स्थानिकांच्या हातात काहीच लागणार नाही. यात स्थानिक मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स, एलईडी पर्सनीननेट नौका यांचा पारंपारीक मासेमारीला धोका आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना आर्थिक व इतर नुकसांनीचा सामना करावा लागणार आहे.
महेंद्र चोगले – मच्छीमार, हर्णै
वादळी हवामानामुळे आजचा मुहूर्त हुकणार
रत्नागिरी : राष्ट्रीय हद्दीतील मासेमारीचा 1 ऑगस्टचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. कारण किनारपट्टी भागात सध्या वादळी हवामान आहे. त्यामुळे राष्ट्रीय हद्दीतील मासेमारीचा नवा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक आहे. हवामान विभागानेदेखील 3 ऑगस्टपर्यंत पावसाचा यलो अलर्ट दिला असल्याने पुढील तीन ते चार दिवस नवा मासेमारी हंगाम सुरू होण्याची शक्यता धूसर आहे.
Source link



