आंबोलीत रविवारी ‘स्वच्छतेची वारी’

सावंतवाडी प्रतिनिधी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाट परिसरात स्वच्छता राखण्यासाठी रविवार, दि. २६ जुलै रोजी पूर्वीचा वस येथे सकाळी ९.३० वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोलीच्या सहकार्याने आणि ‘स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग’ यांच्या पुढाकाराने ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे उपस्थित राहणार आहेत. आंबोली ग्रामपंचायतीच्या प्रशासक तथा माजी सरपंच श्रीमती सावित्री पालेकर यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जि. प. सदस्या शोभा गावडे, तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी वैभव भिसे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, गटविकास अधिकारी निलेश जाधव, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे तसेच चौकुळचे प्रशासक तथा माजी सरपंच गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आंबोली पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करतानाच पर्यटनस्थळाची स्वच्छता करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाचा संदेश या मोहिमेतून देण्यात येणार आहे. आंबोली टुरिझम आणि आंबोली पर्यटन व्यावसायिक महासंघ यांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभणार असून ते मोहिमेत सहभागी होणार आहेत. ‘पर्यटकांचे स्वागत करूया; पण कचरा न फेकण्याचे आवाहन करूया,’ या संदेशातून आंबोलीचे निसर्गसौंदर्य आणि स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जिल्हाभरातील स्वच्छताप्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वच्छता मिशनचे निमंत्रक पत्रकार गणेश जेठे यांनी केले आहे.
Source link



