Jharkhand Intercast Marriage issue दुसऱ्या जातीतील अग्निवीर सैनिकाशी मुलीचे लग्न कुटूंबाला अमान्य, जिवंतपणीच केले अंत्यसंस्कार

झारखंड राज्यातील एका कुटूंबाने मुलीचे आंतरजातीय लग्न अमान्य करत आपल्याच मुलीचे जिवंतपणी अंत्यसंस्कार केले आहेत. मानवी मुल्यांना काळीमा फासणारी ही घटना छत्रा जिल्ह्यात घडली असून लग्नानंतर आम्हाला धमक्या येत असल्याची तक्रार मुलाच्या कुटुंबाने केली आहे.
दरम्यान आपल्या मुलीच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करत संबंधित कुटुंबाने आपल्याच मुलीचा फोटो पुतळ्याला लावून त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली असून राम नाम सत्य असा प्रेतयात्रेवेळी केला जाणारा जपही केला.
अग्निवीर तरुणाशी केलेले लग्न अमान्य
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, वधू सज्ञान असून तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. ती एका ब्राह्मण कुटुंबातील असून, तिने झारखंडमधील कुशवाहा (ओबीसी) म्हणून वर्गीकृत असलेल्या डांगी समाजातील एका अग्निवीर सैनिकाशी लग्न केले आहे.
गिधौर पोलीस ठाण्याचे प्रभारी पुरुषोत्तम अग्निहोत्री यांनी सांगितले की, आमच्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद करण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांनी सुरुवातीला पोलिसांशी संपर्क साधला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार “आम्ही त्या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना आमच्यासमोर हजर केले. ती महिला २१ वर्षांची आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की ती स्वेच्छेने गेली होती आणि तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केले होते,”
मुलीने स्वेच्छेने केले लग्न
त्यांनी सांगितले की, अपहरणाचा कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, कारण त्या महिलेने जबरदस्ती झाल्याचा आरोप केलेला नाही. “मुलीने स्वतःच सांगितले की तिने स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे,” असे ते म्हणाले.
अग्निहोत्री यांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेने तिच्या कुटुंबीयांकडून दबाव आणला जात असल्याचाही आक्षेप घेतला आणि हे असेच चालू राहिल्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या जोडप्याला जाण्याची परवानगी दिली.
Source link



