वारकरी बंधुहो काळजी घ्या… आषाढी वारीवर पावसाचे सावट, इंद्रायणीच्या पुरामुळे देहू, आळंदीत न येण्याचे विश्वस्त, प्रशासनाचे आवाहन

त. भा. प्रतिनिधी पिंपरी, पुणे
आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. मावळ व पिंपरी चिंचवड परिसरातील अतिवृष्टीमुळे देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदीला जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
त्यामुळे वारकऱ्यांनीनी देहू आळंदीत येऊ नये, ज्या ठिकाणी आहात तेथेच सुरक्षित थांबावे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधून पालखीत सहभागी व्हावे, असे आवाहन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीने तसेच प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आणखी 48 तास पावसाचा धडाका कायम राहण्याचा अंदाज असल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यावर पावसाचे सावट दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे महापूर
दोन दिवसांपासून पुणे जिल्हा आणि विशेषत: मावळ, देहू व आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीची दोन्ही पात्रे दुथडी भरून वाहत असून आळंदी व देहू परिसरातील अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणी नदीची वाढती पातळी आणि धुवाँधार पाऊस पाहता वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, दोन्ही देवस्थान संस्थानने केले आहे.
तुकोबांच्या पालखीचे 7 जुलैला देहूतून प्रस्थान झाल्यानंतर त्या दिवशी पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. 8 जुलैला माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. बुधवारी पालखीचा मुक्काम आळंदीतील गांधीवाड्यात असणार आहे. यादिवशी तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचणार आहे.
तुकोबांचे पालखी प्रस्थान दुपारी
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदा 341 वा पालखी सोहळा असून प्रस्थान सोहळ्याची सुऊवात मंगळवारी पहाटेपासूनच होणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. इनामदारवाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी अडीचच्या सुमारास इनामदारवाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात येतील. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा होईल आणि पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल. रात्री इनामदारवाड्यातच पालखी सोहळ्याचा मुक्काम असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली.
Source link



