शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

खासबागमध्ये झाड कोसळून तीन घरांचे नुकसान : सखल भागात साचले पाणी
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा शनिवारी जोर वाढला. बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर पावसाच्या सरी प्रचंड कोसळू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शनिवारी शहरातील आठवडी बाजार असतानाही पावसामुळे मुख्य बाजारपेठेत शांतता दिसून आली. काही ठिकाणी झाडे कोसळून घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : शनिवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सतत पावसाच्या सरी नसल्यातरी थोड्याथोड्या वेळाने पाऊस कोसळत होता. दुपारनंतर अधिक जोर धरल्याने शहर जलमय झाले. अनेक ठिकाणी गटारी तुंबून पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. उप्पार गल्ली खासबाग येथे जुनाट चिंचेचे झाड कोसळून घरांचे नुकसान झाले. तर कॅम्प येथे इस्लामिया शाळेची संरक्षक भिंत कोसळली. याबरोबरच जलवाहिन्या घालण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे शहरात सर्वत्र चिखलमय परिस्थिती पहायला मिळाली.
धर्मवीर संभाजी चौक येथे कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने बसथांब्यावर पाणी साचले होते. सरदार्स मैदानातील पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने मैदानाच्या अंतर्गत भागात पाणी साचले होते. अशीच परिस्थिती उपनगरांमध्येही पहायला मिळाली. उद्यमबाग येथे पावसाचे पाणी शिरून काही कारखान्यांच्या साहित्याचे नुकसान झाले.
उप्पार गल्ली खासबाग येथे घरावर झाड कोसळले
सततच्या पावसाने उप्पार गल्ली खासबाग येथे जुनाट चिंचेचे झाड कोसळण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. 200 वर्षे जुने झाड कोसळून तीन घरांचे नुकसान झाले आहे. झाडाशेजारी असलेले भरमदेव मंदिरही जमीनदोस्त झाले. या घटनेत आनंद भादवणकर, एकनाथ भादवणकर, प्रशांत गोरले यांच्या घराचे नुकसान झाले. घराच्या मागे कपडे धुवत असणारी महिला जखमी झाली आहे. अनिल मुतगेकर यांच्या घराचे कंपाऊंडही कोसळले.
इस्लामिया शाळेची संरक्षक भिंत कोसळली
कॅम्प येथील इस्लामिया शाळेची संरक्षक भिंत शनिवारी पहाटे कोसळली. दररोज शेकडो विद्यार्थी या परिसरात खेळत असतात. परंतु सुदैवाने शाळा बंद असताना जुनी दगडी भिंत कोसळली. भिंतीचे दगड हटविण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने दिवसभर सुरू होते. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने जुन्या कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या भिंतींचा सर्व्हे करून संबंधित मालकांना योग्य ती सूचना करावी, अशी मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंटकडून वनिता विद्यालय परिसरात नाल्याची स्वच्छता
शनिवारी सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वनिता विद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागली. गुडघाभर पाणी साचल्याने पालकांनीही चिंता व्यक्त केली होती. अखेर कॅन्टोन्मेंट प्रशासनाने नाल्याच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. कॉलेज रोडवर नाल्यामध्येच काँक्रीटचा खांब असल्याने त्या ठिकाणी कचरा अडकून पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे सकिंग मशीनच्या साहाय्याने स्वच्छता करून पाण्याचा निचरा करण्यात आला.
Source link



