Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची आर्थिक फसवणूक

सायबर चोरट्यांनी केली ज्येष्ठ नागरिकाची फसवणुक
पुणे : अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत.
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली होती. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी दाखविली होती.
या प्रकाराची माहिती कोणाला देऊ नये, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. अटकेची कारवाई न होण्यासाठी तातडीने बँक खात्यात पैसे जमावे करावे लागतील, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात त्यांनी वेळोवेळी ७४ लाख रुपये जमा केले.
पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते पुढील तपास करत आहेत.
Source link



