ऐसन कैसन बरसत बरखा

फार कशाला जुन्या सिनेमातली ‘पानी पानी रे’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘कहाँ से आये बदरा’ किंवा ‘अल्ला मेघ दे पानी दे’ यासारखे गाणे डोळे मिटून आठवा. खरंतर आता पाऊस भरपूर पडतो आहे तेव्हा मल्हारचे सगळे प्रकार मनात रुळायला हरकत नाही. मल्हारच्या सर्व प्रकारांचे कार्यक्रमही जोरदार सुरू आहेत सगळीकडे. आणि तो आनंद साजरा करू नये असं थोडंच आहे? आलेला पाऊस साजरा का नाही करायचा? त्याच्यामुळे तर जीवन आहे!
ऐ सन कैसन बरसत बरखा
घिर घिर आयी छाई दिस चहुआ
बहु दिन ते छिप गयो सुरजवा
ऊब रे गई बरसन ते मनुवा…
कामोदमधली कुमार गंधर्वांची ही चीज ऐकता ऐकता मनात आलं की यंदा पाऊस काहीसा उशिराच आला. गेल्यावर्षीचं पावसाचं प्रकरण निराळंच होतं. एकदम मे महिन्यात जो पाऊस सुरू झाला तो धोधोधो करून डिसेंबरपर्यंत पडतच होता. आणि यावेळी मात्र पावसाने अगदी डोळ्यात पाणी आणलं. पाऊस अधिकृतपणे सुरू व्हायला जवळपास जुलै उजाडला. आता दुसरी बातमी सध्या जोरावर आहे ती म्हणजे युरोपमधली हीटवेव्ह! अगदी ग्रेट ब्रिटनपासून ते स्पेन, इटलीपासून ते थेट नॉर्वेपर्यंत बऱ्याचशा देशांना ह्या हीटवेव्हने इतका वाईट फटका दिलाय की जितका त्यांनी कधीही अनुभवला नसेल. विचारही केला नसेल. जगात तीन चतुर्थांश पाणी आहे आणि एक चतुर्थांशच जमीन आहे. पाण्याखालची जमीन किती आहे याचा थांग पाण्याला सुद्धा लागलेला नसेल. माणसांना लागण्याचा प्रश्नच येत नाही. याचाच अर्थ आपल्या पृथ्वीवर अथांग, अफाट पाणी आहे. आपल्या देहात सुद्धा 75 टक्क्यांहून अधिक पाणीच असतं. म्हणून की काय पृथ्वीवरच्या पाण्याच्या दाबाचा मानवी शरीरावरती परिणाम होतो असं म्हटलं जातं. यातली अंधश्रद्धा किती आणि श्रद्धा किती हा भाग फार वेगळा आहे. परंतु आपल्या आयुष्यात आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत सर्वाधिक परिणाम करणारी गोष्ट म्हणजे पाणी असं म्हणावं लागेल. तसं तर पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांनीच आपलं शरीर बनलेलं असतं. कमी अधिक प्रमाणात त्यातलं कोणतंतरी तत्व आपल्या देहात जोरकस असतं. असं जरी असलं तरी आपलं आयुष्य पाण्याच्याच लहरीवर चालत असतं. त्याला काही पर्याय नाही. कारणही त्याला तसंच आहे. शरीरात पाणी कमी झालं तर मग
रिकामी सांजंची घागर
हरणीच्या दारात वाघरं
अशी शरीराची अवस्था व्हायला वेळ लागत नाही. कुठल्याही आजारात शरीरातलं पाणी कमी होणं हा फार मोठा धोका समजला जातो, असं डॉक्टर सांगतात. त्याचमुळे ऋतुमानाप्रमाणे जे आजार होतात त्या आजारातून बरं होताना शरीरामध्ये पाण्याची पातळी पुरेशी ठेवणे ही मुख्य काळजी घ्यायला सांगितली जाते. म्हणजे नारळपाणी, सरबत साधं पाणी, ओआरएस, यातल्या कोणत्यातरी स्वरूपात शरीरात सतत पाणी घेत राहावं लागतं. एकीकडे आयुर्वेद म्हणतो की घोटभर पाणी पचायला सुद्धा शरीराला राबावं लागतं तेव्हा अनावश्यक पाणी पिऊ नका. दुसरीकडे आधुनिक वैद्यक शास्त्र सांगतं की शरीरातली पाण्याची पातळी राखली गेलीच पाहिजे म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा. एक वेळ अशी असते की ब्रह्मपुत्रा, दामोदर यासारख्या नद्यांना पूर आला की पूर्वोत्तर राज्य ते थेट बंगालपर्यंत पाण्याच्या प्रकोपाचे शेकडो बळी दरवर्षी जातच असतात. एकीकडे अशी परिस्थिती असते की जेवढा पाऊस व्हायला हवा त्याच्या एक दशांशसुद्धा न झाल्याने दरवर्षी कपाळावर हात घेऊन आकाशाकडे बघायची स्थिती ही अनेक शेतकऱ्यांवर येते. कोरड्या दुष्काळामुळे आत्महत्या घडत असतात. पाण्याचे हे सगळेच हिशेब आपल्याला अगम्य आहेत. आपण विचार करत राहिलो तर पाण्याची अनेक रूपं आपल्याला दिसतील. त्या सगळ्या रूपांकडे बघितलं की आपोआपच पाण्याचे हिशेब क्लिअर व्हायला सुरुवात होते. ‘पानी फाउंडेशन’ सारख्या एका संस्थेने चांगल्या पद्धतीने बरेच प्रकल्प राबवायला सुरुवात केली. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ या फाउंडेशननेही बरेचसे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. ‘जा जरा पूर्वेकडे’ या पुस्तकाचा लेखक आशुतोष जोशी यांनी त्याच्या नरवण गावात नदीचा गाळ उपसायची मोठी कामगिरी या फाउंडेशनला सोबतीला घेऊन पार पाडली. आजवर अडलेलं गावातलं पाणी वाहतं करण्याचं मोठं कार्य केलं हेही आपण फेसबुकवर वाचत असू. अशा माणसांकडे बघितलं की वाटतं सूर्यासारखं मोठं काम करणं प्रत्येकाला ताबडतोब जरी शक्य नसलं तरी हे असे छोटे छोटे दिवे गावोगावी तेवत आहेत म्हणून गाव जगत आहे. अजूनही खरा भारत खेड्यात आहे असं गृहीत धरलं तर ही खेडी जगवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची असेल तर मुख्य जपले पाहिजेत ते म्हणजे तिथले जलस्रोत.
‘लगान’ सारखा सिनेमा हा जागतिक पातळीवर गाजला होता. तिथेही हीच समस्या प्रामुख्याने दाखवलेली दिसते. ती म्हणजे पाण्याअभावी असलेला दुष्काळ आणि त्यामुळे शेतसारा भरायला न जमणं आणि त्याच्याभोवती फिरणारी कथा! तिथे असलेली गावं आणि त्या गावांचं दाखवलेलं वातावरण हे आपल्याला दुष्काळी प्रदेशाचं अचूक चित्र दाखवतं. आजही भारतातल्या अनेक राज्यांमध्ये दुष्काळी भाग बरेच आहेत. सरळसोट मैलोनमैल पसरलेली जमीन, अगदी रोड असणारं पाण्याचे प्रमाण, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा करावा लागणारा संघर्ष आणि शहरात एक माणूस जेवढं पाणी शॉवर घ्यायला खर्च करतो तेवढ्या पाण्यात आपला अख्खा दिवस काढणारा गाव हे कटू सत्य आजच्याही जाहिरातींमधून आपल्यासमोर कधी ना कधी येतच असेल. फार कशाला जुन्या सिनेमातली ‘पानी पानी रे’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘कहाँ से आये बदरा’ किंवा ‘अल्ला मेघ दे पानी दे’ यासारखे गाणे डोळे मिटून आठवा. खरंतर आता पाऊस भरपूर पडतो आहे तेव्हा मल्हारचे सगळे प्रकार मनात रुळायला हरकत नाही. मल्हारच्या सर्व प्रकारांचे कार्यक्रमही जोरदार सुरू आहेत सगळीकडे. आणि तो आनंद साजरा करू नये असं थोडंच आहे? आलेला पाऊस साजरा का नाही करायचा? त्याच्यामुळे तर जीवन आहे! आणि पावसामुळे हिरवीगार झालेली सृष्टी वातावरणात आलेल्या थंडावा आणि मलहरण करणारा मल्हार सृष्टीत भरून राहिलेला आहे. अशा वेळी अगदी मिया की मल्हार पासून ते जयंतीमल्हार रामदासी मल्हार सारख्या सर्व रागांचे सोहळे मनसोक्त उपभोगावेत असं कोणा संगीतप्रेमीला वाटणार नाही? ते अनुभवावेतच. पण आजच्या मल्हाराच्या पाठीमागे असलेला ग्रीष्माचा ताप अपरिहार्य असतो तो विसरता कामा नये, एवढं मात्र नक्की वाटतं. कारण आज पृथ्वीवर पाण्याची जी आबादीआबाद आहे जी लयलूट आहे ती येण्यासाठी एकेकाळी त्या पृथ्वीला स्वत:चा देह फार तापवून घ्यावा लागला होता. अगदी भट्टीतूनच काढून घ्यावा लागला होता म्हणा ना! ऋतुचक्र बदलत आहे. म्हणून की काय उष्णता काय असते हे कधीच अनुभवलेल्या युरोपवर सुद्धा ती उष्णता अनुभवायची वेळ येते आहे. कुठे रेल्वेचे रूळ वाकडे होत आहेत. कुठे गाड्यांचे टायर वितळत आहेत. कुठे रस्त्यावरचं डांबरच पातळ होतंय, तर कुठे पायात घालायची चप्पलसुद्धा पसरून आकारहीन होत आहे. उष्णतेने हजारावर लोकांचे बळी घेतले आहेत. हे कसं चित्र म्हणायचं? या लोकांसाठी प्रार्थना करणे तिथली हीटवेव्ह लवकर उतरावी अशी इच्छा व्यक्त करणे याशिवाय आपल्या हाती काय आहे?
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु
Source link



