Miraj Instruments Tradition सुरांना घडवणाऱ्या हातांचा राज्याने केला सन्मान; मिरजेच्या २०० वर्षांच्या परंपरेला नवा मान

सांगली : सतार, तानपूरा आणि व्हायोलिनसारख्या तंतूवाद्यांच्या निर्मितीसाठी जगभरात ओळख असलेल्या मिरजच्या दोनशे वर्षांच्या परंपरेला महाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे. सात पिढ्यांपासून तंतूवाद्य निर्मितीचा वारसा जपणारे कारागीर मोहसिन नियाझ अहमद मिरजकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य उत्कृष्ट कारागीर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
जागतिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी मुंबईतील सिडको भवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील विविध पारंपरिक कलांचा वारसा जपणाऱ्या सहा कारागिरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये मिरजेच्या तंतूवाद्य निर्मिती परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे मोहसिन मिरजकर यांची निवड झाली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहसिन मिरजकर यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून मिरजेच्या दोनशे वर्षांच्या तंतूवाद्य परंपरेचा आणि या कलेसाठी आयुष्य वाहिलेल्या सर्व कारागिरांचा असल्याची भावना व्यक्त केली. या कलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
मिरजेच्या तंतूवाद्य निर्मितीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. राज्य शासनाच्या या सन्मानामुळे या पारंपरिक कलेच्या संवर्धनाला आणि कारागिरांना नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Source link



