कुडाळला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात

दिवाणी न्यायालय व वकील संघटनेचे आयोजन
अंमली पदार्थाचे दुष्परिणाम व महिलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
कुडाळ/ वार्ताहर
कुडाळ येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व कुडाळ तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिन कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज येथे उत्साहात साजरा करण्यात आला होता. दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष जी. ए .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम कुडाळ हायस्कुल ज्यनिअर कॉलेजचे उपप्राचार्य नारायण साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ,तर कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे ,पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर कुडाळ तालुका वकील संघटनेचे अँड. संजय रानडे व अँड.कविता खोचरे – बोभाटे प्रमुख उपस्थितीत झाला.दरवर्षी २६ जून हा दिवस अंमली पदार्थाचे सेवन आणि त्यांची अवैध तस्करी यामुळे समाजावर होणारे दुष्परिणाम याबद्दल जागरुकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. हवालदार श्री. काळसेकर यांनी अंमली पदार्थामुळे तरुणांचे भविष्य, कुटुंब आणि समाज उद्धवस्त होतो. अवैध तस्करीमुळे गुन्हेगारी, दहशतवाद आणि भ्रष्टााचार वाढतो.आरोग्य तसेच आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात, असे सांगून व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत विस्तृत माहिती दिली कुणाला व्यसन असेल, तर समुपदेशक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. अंमली पदार्थ विक्रीची माहिती पोलीसांना कळवा, असे आवाहन त्यांनी केले तसेच अँड.रानडे यांनी लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनयम २०१२ याबाबत मार्गदर्शन केले. १८ वर्षाखालील मुला- मुलींवर होणारे लैगिंक अत्याचार, लैगिंक छळ आणि अश्लील चित्रफित रोखण्यासाठी भारत सरकारने बनविलेला हा विशेष कायदा असल्याचे त्यांनी सांगितले. अँड.खोचरे-बोभाटे यांनी समाजातील महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता याबाबात मार्गदर्शन केले. प्रत्येक स्त्रीला घरात, रस्त्यावर कामाच्या ठिकाणी कुठेही भीतीशिवाय जगण्याचा , वावरण्याचा आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार हा मुलभूत मानवी हक्क आहे,असे सांगून महिलांच्या संरक्षणाबाबत विविध कायद्याची माहिती दिली.उपप्राचार्य श्री साळवी यांनी कार्यक्रमात दिलेल्या मार्गदर्शनाचा आपल्या जीवनात पुरेपुर वापर विद्यार्थ्यांनी करावा ,असे आवाहन केले.कार्यक्रमाचे नियोजन विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय (कुडाळ )चे वरीष्ठ लिपीक आर. टी. आरेकर व शिपाई श्री कडव यांनी केले. कार्यक्रमात ८५ ते ९० विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.
Source link



