ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड कायम, पाकिस्तानवर 113 धावांनी मात,

वृत्तसंस्था, लीड्स
हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या महिला टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी धुव्वा उडवला आणि आपली विजयी घोडदौड कायम राखली.
गटातील एक सामना शिल्लक असतानाही आणि सलग चार सामने जिंकूनही ऑस्ट्रेलियाने अद्याप उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेले नाही. कारण त्यांच्या गटातील प्रतिस्पर्धी दक्षिण ऑफ्रिका आणि भारत हे संघही अखेरीस चार विजय मिळवू शकतात. रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आजवर कधीही उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरलेला नाही.
ब्रिस्टलमध्ये झालेल्या दुहेरी सामन्यांच्या सत्रात (डबलहेडर) विजय मिळवून गतविजेता न्यूझीलंड आणि श्रीलंका यांनी उपांत्य फेरीच्या आपल्या क्षीण आशा जिवंत ठेवल्या. न्यूझीलंडने स्कॉटलंडचा सहा गडी राखून पराभव केला तर श्रीलंकेने आयर्लंडवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत, अशी भावना व्यक्त केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच श्रीलंकेच्या चमारी अटापटूने विश्वचषकाच्या इतिहासातील आठवे शतक झळकावले. तिने संघाच्या एकूण 134 धावांपैकी नाबाद 106 धावांची खेळी केली.
पेरीची 71 धावांची खेळी आणि 2 बळी
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करीत 7 बाद 199 धावा केल्या आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव 14 षटकांत 86 धावांत गुंडाळला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बेथ मुनी बाद झाली असली तरी एलिसा पेरी आणि जॉर्जिया व्होल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेत पॉवरप्लेमध्ये 64-1 अशी मजल मारली. ही या स्पर्धेतील सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या ठरली. 56 चेंडूमध्ये त्यांनी 100 धावांची भागिदारी केली. ज्यामध्ये व्होलच्या 39 धावांचा समावेश होता. पेरी 48 चेंडूत 71 धावा करून बाद झाली तर अॅनाबेल सदरलँड (27), निकोला कॅरी (26) यांच्या छोटेखानी पण आक्रमक खेळींमुळे धावगती कायम राहिली. शनिवारी पाठदुखीमुळे मुनीला मैदान सोडावे लागले होते. परंतु मंगळवारी तिने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली. यावेळी तिला उजव्या मनगटावर दुखापत झाल्याचे दिसले. तरीही तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तीन झेल टिपले.
पाकिस्तानने तीन रन आउट (धावबाद) होऊन स्वत:चेच नुकसान करून घेतले. यापैकी दोनवेळा सलामीवीर मुनीबा अलीची चूक होती. जिने 32 धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी केली. पेरीने तिच्या एकमेव षटकात दोन बळी घेतले. तसेच कर्णधार सोफी मोलिनक्स आणि सदरलँड यांनीही प्रत्येकी 2 बळी मिळविले. जॉर्जिया वेअरहॅमने 2 षटकांत 1 बळी घेतला आणि त्यात 11 निर्धाव चेंडू टाकले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलियन महिला संघ 20 षटकांत 7 बाद 199, पाक 14 षटकांत सर्व बाद 86.
Source link



