मायनिंगच्या नावाखाली पुन्हा दहशतवादी प्रवृत्ती सुरू होणार का?

मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल
कुडाळ/ वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनसामान्यांचा विरोध डावलून सत्तेच्या जोरावर जबरदस्तीने आजगाव – धाकोरे भागात मायनिंगचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीचा मनसे जाहीर निषेध करीत आहे.चुकीच्या पद्धतीने स्वतःच्याच गावात होणाऱ्या ड्रोन सर्व्हेला विरोध केलेल्याच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. मायनिंगच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा दहशतवादी प्रवृत्ती सुरू होणार की काय? असा सवाल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनिंग विरोधी लढ्याला मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे.मनसे नेते शिरीष सावंत यांनी कृती समिती अध्यक्षांशी चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.आजगाव – धाकोरे परिसरात ज्या पद्धतीने ड्रोन कॅमेरा मार्फत जे. एस. डब्ल्यू कंपनीचा सर्व्हे सुरू होता. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा एकदा कळणे पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील ही गावे असून पूर्वी दहशतवाद – दहशतवाद म्हणून ओरड मारणारे श्री केसरकर आज याबाबतीत आवाज उठवतील का ? असा सवाल श्री किनळेकर यांनी केला आहे. धाकोरे आणि आजगावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये मायनिंगच्या विरोधात बहुसंख्येने ठराव घेऊन सुद्धा त्या ठिकाणी अनधिकृत सर्व्हेचा रेटा सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे. जिल्ह्यातील राज्य कर्त्यांच्या वरदहस्तामुळे त्या ठिकाणी बाहेरून येऊन सर्व्हे करण्याची हिंमत या मायनिंग कंपन्यांना होत आहे,असा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी , जिल्हाधिकारी यांना याची कल्पना नाही का? असा सवाल उपस्थित करून आमदार श्री केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून हे प्रस्तावित मायनिंग या आपल्या मतदारसंघातून बंद करावे. या मायनिंग दलालांच्या विरोधात आपल्या सर्वांना एकजुटीने आवाज उठवावा लागेल, तरच हे थांबू शकेल. आजगाव – धाकोरा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी ही एकजूट अशीच कायम ठेवावी.कोणाच्याही दडपशाहीला किंवा दहशतीला न घाबरता आपला परिसर आपल्याला वाचवायचा आहे,असे आवाहन किनळेकर यांनी केले आहे. या मायनिंग प्रकल्पाला दहाही गावांचा पूर्णपणे विरोध असून या गावातून 2022 पासून आतापर्यंत अनेक ग्रामसभेद्वारे विरोधात ठराव घेत ग्रामस्थांनी शासनाला लेखी स्वरूपातही कळविले होते. परंतु गेल्या काही दिवसापासून या गावांमध्ये मॅग्नेटिक ड्रोनद्वारे सुरू केलेला सर्व्हे कृती समितीच्या व ग्रामस्थांनी बंद पडला. त्यावर प्रशासनाने ग्रामस्थांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर मनसेमार्फत पक्षाचे नेते शिरीष सावंत यांच्या सूचनेनुसार मनसे आपण तसेच तालुकाध्यक्ष सनी बागकर, उपतालुकाध्यक्ष महादेव तांडेल, विभाग अध्यक्ष पवन बागायतकर,विनायक फटनाईक यांनी कृती समितीचे अध्यक्ष अजित नातु यांची भेट घेतली. मनसे प्रस्तावित मायनिंग प्रकल्प विरोधी लढ्यात आपल्या सोबत राहणार असल्याचे आश्वासन दिले.पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी श्री नातू यांच्याशी फोनवर चर्चा केली व लवकरच सर्व कृती समिती सदस्य तसेच ग्रामस्थांची भेट घेणार असल्याचे सांगितले,असे श्री किनळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
Source link



