भाजप संघटनेत व्यापक परिवर्तन शक्य

राजनाथसिंग यांच्या घरी बैठक, लवकरच निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षामध्ये लवकरच व्यापक संघटनात्मक परिवर्तन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या निवासस्थानी मंगळवारी प्रदीर्घ बैठक झाली आहे. चार तास चाललेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेसुद्धा सहभागी झाले, अशी माहिती आहे.
भारतीय जनता पक्षाकडून या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, बऱ्याच दिवसांपासून या परिवर्तनाची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना साहाय्य करण्यासाठी आता नव्या सहकाऱ्यांची निवड केली जाईल, अशी शक्यता आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पक्षाच्या संघटनेत नव्या कार्यकर्त्यांचा समावेश केला जाईल. जुन्या आणि अनुभवी नेत्यांप्रमाणेच नव्या रक्तालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. जातीय समीकरणांचेही या परिवर्तनात भान ठेवले जाईल, अशी चर्चा आहे.
अनेक राज्यांमध्ये निवडणुका
पुढच्या वर्षी, अर्थात 2027 मध्ये सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि गुजरात अशी ही सात राज्ये आहेत. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची विधानसभा निवडणुकांची ही सर्वात मोठी फेरी आहे. या विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण बळानिशी उतरण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. सध्या या राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. या राज्यांमधील सत्ता राखून हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेणे आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षासमोर आव्हान उभे करणे, यासाठी पक्षला सज्ज केले जात आहे.
पाच जिल्ह्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती
उत्तर प्रदेशात पक्षाने पाच नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. आंबेडकरनगर जिल्हाध्यक्षपदी दिलीप देव पटेल, वाराणसी जिल्हध्यक्षपदी राम सकल पटेल, चंदौली जिल्हाध्यक्षपदी काशीनाथ सिंग आणि गोरखपूर जिल्हाध्यक्षपदी काली प्रसाद देवरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सत्ता राखण्यावर भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात डिसेंबर 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार नंतर केला जाईल.
अनेक राज्यांमध्ये नवे अध्यक्ष
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये नव्या राज्यअध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीच्या प्रदेश अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणा प्रदेश अध्यक्षपदी अर्चना गुप्ता, पंजाब प्रदेश अध्यक्षपदी केवल प्रसाद धिल्लाँ, तर त्रिपुरा प्रदेश अध्यक्षपदी या राज्याच्या विधानसभेत प्रथम आमदार म्हणून निवडून आलेल्या अभिषेक देवरॉय यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले आहे. यावेळी जे व्यापक परिवर्तन होईल, त्यात 70 ते 80 टक्के इतक्या प्रमाणात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.
Source link



